२.८२ कोटींच्या थकीत कर्जामुळे कोहिनूर कॉलेजची इमारत सील

चोलामंडलम फायनान्स कंपनीने कोहिनूर एज्युकेशन सोसायटीकडून घेतलेल्या कर्जाच्या न परतफेडीवर मोठी कारवाई केली आहे. संस्थेकडून २ कोटी ८२ लाख ८६ हजार २५४ रुपयांचे कर्ज थकीत होतं. या रकमेच्या वसुलीसाठी जिल्हा सत्र न्यायालयाने आदेश दिल्यानंतर, रविवारी म्हणजेच १२ ऑक्टोबर रोजी इमारतीला सील ठोकण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच सिटी न्यूजने सर्वप्रथम ही बातमी प्रसारित केली होती. आणि , १३ ऑक्टोबर रोजी सोमवारी, कॉलेजच्या बाहेरच विद्यार्थ्यांचा मेळावा जमला शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी अक्षरशः रस्त्यावर बसून गोंधळलेल्या अवस्थेत होते. विद्यार्थ्यांना आता आपलं शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती वाटते आहे. अनेक पालक कॉलेज प्रशासनावर आणि शासन यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत — विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, तर जबाबदार कोण?
उल्लेखनीय म्हणजे, कोहिनूर कॉलेजचे संचालक मजहर खान आणि त्यांची पत्नी आसमा खान यांच्यावर आधीपासूनच बोगस डिग्री वितरणासंबंधी गुन्हे दाखल आहेत. आता या नवीन प्रकरणामुळे कोहिनूर संस्थेच्या विश्वसनीयतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शासन व विद्यापीठ प्रशासन आता पुढे काय कारवाई करते, आणि विद्यार्थ्यांचे भविष्य कसे सुरक्षित ठेवते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



