Latest NewsMaharashtraPune

पुण्यात दहशतवाद्यांचा शोध! कोंढवा आणि पिंपरी चिंचवडमध्ये एटीएसचं मोठं ऑपरेशन, 18 संशयित ताब्यात

पुणे : पुणे शहर पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या संभाव्य उपस्थितीमुळे धास्तावलं आहे. मध्यरात्रीपासून एटीएस (Antiterrorism Squad) आणि पुणे पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने कोंढवा आणि पिंपरी चिंचवड परिसरात मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. या ऑपरेशनमध्ये 300 हून अधिक पोलीस कर्मचारी सहभागी झाले असून, 18 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

संशयित हालचालींवरून कारवाई

कोंढवा येथील मीठानगरसह एकूण 19 ते 25 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. तपास यंत्रणांना दहशतवादाशी संबंधित संशयित व्यक्तींच्या हालचालींबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यावेळी काहीजणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

2023च्या प्रकरणाशी दुवा?

माहितीनुसार, 2023 साली कोंढवा परिसरातून आयएसआयएसशी संबंधित तीन संशयितांना अटक झाली होती. त्यांच्या कब्जात बॉम्ब तयार करण्याचं साहित्य आणि ड्रोन मटेरियल आढळून आलं होतं. सध्याच्या छापेमारीचा संबंध याच प्रकरणाशी जोडण्यात येत असून, नव्या संशयितांपर्यंत तपास पोहोचला आहे.

एनआयएचीही मदत

या मोठ्या ऑपरेशनमध्ये महाराष्ट्र एटीएससह राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) देखील सहभागी झाली आहे. पुण्यातील कोंढवा आणि पिंपरी चिंचवड परिसरात समांतर सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. काही तासांतच ताब्यात घेतलेल्या संशयितांचे मोबाईल फोन आणि काही इलेक्ट्रॉनिक साधनं जप्त करण्यात आली आहेत.

सुरक्षा व्यवस्था कडक

छापेमारीनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सध्या 500 हून अधिक पोलीस कर्मचारी या भागात तैनात करण्यात आले असून, नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

पुण्यात याआधीही दहशतवादविरोधी मोहिमा

पुणे हे आयएम, लश्कर-ए-तैयबा आणि आयएसआयएससारख्या संघटनांच्या रडारवर असल्याचं याआधीच्या अनेक प्रकरणांतून समोर आलं आहे. याआधीही शहरात अशा प्रकारच्या मोठ्या कारवाया करण्यात आल्या असून, तपास यंत्रणांकडून वेळोवेळी खबरदारी घेण्यात येते.

संपूर्ण देशाचं लक्ष सध्या पुण्याकडे वळलं असून, आगामी काळात या कारवाईबाबत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

आपली सुरक्षा, आपली जबाबदारी — संशयास्पद हालचाली दिसल्यास नजीकच्या पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधा.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button