“एक व्यक्ती–एक रुपया” : गो. से. महाविद्यालयाचा पूरग्रस्तांना मदतीचा संकल्प

खामगाव – संपूर्ण महाराष्ट्रावर मुसळधार पावसाने कहर केला असून अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची घरे, जनावरे वाहून गेली आहेत, तर हजारो कुटुंबे उपाशीपोटी उघड्यावर आणि बेघर अवस्थेत दिवस काढत आहेत. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर गो.से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय खामगाव परिवाराने पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.), राष्ट्रीय छात्र सेना (N.C.C.) आणि करिअर कट्टा या विभागांच्या विद्यार्थ्यांनी मिळून “एक व्यक्ती–एक रुपया” या संकल्पनेवर आधारित निधी संकलन मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत विविध गट तयार करून नागरिकांकडून स्वेच्छेने देणगी गोळा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या आवारात एक देणगी पेटी ठेवण्यात येणार असून त्यामध्ये एक रुपया पासून जास्तीत जास्त रक्कम देणगी स्वरूपात देण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे. शहरी व ग्रामीण भागातील शाळा तसेच इतर महाविद्यालयांमध्येही या मोहिमेचे प्रसार व आवाहन करून अधिकाधिक सहकार्य मिळविण्याचा प्रयत्न होणार आहे. या उपक्रमाबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. धनंजय तळवणकर म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या विचारातून व सहभागातून राबविण्यात येत असलेली ही संकल्पना निश्चितच यशस्वी ठरेल. जमा झालेली रक्कम लवकरच पूरग्रस्त भागात पाठवली जाईल.” सामाजिक बांधिलकी जपत उचललेले हे पाऊल विद्यार्थी वर्गात संवेदनशीलता आणि समाजाभिमुखता वाढविणारे ठरणार आहे. याप्रसंगी विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. दादासाहेब बोबडे आणि सचिव मा. डॉ. प्रशांतजी बोबडे यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. अढाऊ, प्रा. डॉ. नीता बोचे, प्रा. खंदारे, प्रा. शिंदे प्रा. पिढेकर, करिअर कट्टा जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. आठवर, करियर संसदेच्या पदाधिकारी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना विद्यार्थी उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.



