“विद्यार्थ्यांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हावे” – डॉ. स्मिता शिंगरूप

जी. एस. कॉलेज खामगाव : वाणिज्य व अर्थशास्त्र विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय व्याख्यान
खामगाव : स्थानिक विदर्भशिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित, गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभाग व अर्थशास्त्र विभाग तसेच पु. मो. तथा श्रीमती सीतादेवी पुरुषोत्तम झुंझुनवाला स्मारक धर्मदाय ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने १७ सप्टेंबर २०२५ रोजी “स्व. सीतादेवी पुरुषोत्तम झुंझुनवाला राज्यस्तरीय व्याख्यानमाला” अंतर्गत “भारतामधील उद्योजकता आणि स्टार्टअप परिसंस्था (स्थानिक संधींचा संदर्भ)” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख व्याख्यानात श्रीमती मेहरबानू विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अकोला यांच्या प्राचार्या डॉ. स्मिता शिंगरूप यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, “विद्यार्थ्यांनी नोकरी मागणारे न राहता नोकरी देणारे व्हावे. वाणिज्य आणि अर्थशास्त्र या शाखांचे विद्यार्थी अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल घडवू शकतात. जर आपण स्वतःची स्वप्ने पूर्ण केली नाहीत, तर दुसरे कोणी आपल्याला त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कामावर घेतील.” त्यांनी उद्योजकतेसाठी विद्यार्थ्यांना नवनवीन कल्पना विकसित करण्याचे व स्थानिक समस्यांचे समाधान शोधण्याचे आवाहन केले. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात प्रचंड समस्या आहेत, पण त्या समस्याच संधीमध्ये रूपांतरित करता येतात. “केवळ विचार करण्यात वेळ घालवला, तर संधी निसटून जाईल; बदल स्वीकारा व पाऊल उचला” असे सांगून विद्यार्थ्यांना धाडसी होण्यास प्रवृत्त केले. डॉ. शिंगरूप यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी मोठ्या समस्या सोडवण्याआधी आजूबाजूच्या छोट्या समस्यांवर उपाय शोधले पाहिजेत. अशा प्रकल्पांतून खऱ्या अर्थाने उद्योजकता विकसित होते.” तसेच, उद्योजकतेसाठी कल्पना व जोखीम घेण्याची तयारी या गोष्टी महत्त्वाच्या असून पैसा ही शेवटची बाब आहेे. विद्यार्थ्यांना त्यांनी स्टार्टअपसाठी उपलब्ध असलेल्या अमरावती विद्यापीठ तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकजी झुंझुनवाला ह्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचे कौतुक करताना विद्यार्थ्यांना सर्जनशीलतेस प्रोत्साहित केले. “नवीन पिढीला खूप घाई असते, पण जीवन खूप मोठं असतं. म्हणून घाई न करता विचारपूर्वक पुढे चला” असा मौलिक संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. पु. मो. तथा श्रीमती सीतादेवी पुरुषोत्तम झुंझुनवाला स्मारक धर्मदाय ट्रस्टच्या सहकार्याने प्रत्येक शैक्षणिक वर्षात वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी अशा स्वरूपाची दोन राज्यस्तरीय व्याख्याने गो. से. महाविद्यालयात आयोजित केली जातात. अतिथींचे स्वागत आय क्यू ए सी समन्वयक व वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. डी. एन. व्यास आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. आर. गव्हाळे यांनी केले. कार्यक्रम संयोजक डॉ. महेश गायकवाड यांनी प्रास्ताविक करून पूज्य मातोश्री स्व. सीतादेवी झुंझुनवाला यांच्या जीवनकार्याची माहिती दिली व प्रमुख वक्त्या प्राचार्य डॉ. स्मिता शिंगरूप यांचा परिचय करून दिला.. सूत्रसंचालन प्रा. कोमल काले यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रम संयोजक डॉ. एस. टी. वराडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी वाणिज्य व व्यवस्थापन आणि अर्थशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.



