देऊळगाव येथील महादेव मंदिराजवळील नाल्यात मृतदेह सापडला

अकोट- अकोट तालुक्यातील चंडिकापूर गावातील वच्छला श्रीराम नितोने वय ६५, या शनिवारी दुपारी शेतातील काम करून घरी परतत असताना अचानक तब्येत बिघडली आणि चक्कर येऊन त्या नाल्यात कोसळल्या. त्यानंतर त्या घरी न परतल्याने नितोने कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी परिसरात सर्वत्र शोधमोहीम राबवली. फोनवर चौकशी, चौकशी करूनही काहीच माहिती मिळाली नाही. मंगळवारी दुपारी ४ वाजता देऊळगाव येथील महादेव मंदिराजवळ गुराख्यांना त्यांचा मृतदेह नाल्यात अडकलेला आढळून आला. तातडीने गावकऱ्यांना माहिती देण्यात आली आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.
मृतदेह बाहेर काढण्यासाठी चंडिकापूर पोलीस पाटील शंकर लोखंडे, देऊळगाव पोलीस पाटील परीक्षित गावंडे यांच्यासह संतोष वानखेडे, अशोक गहले, दामोदर नितोने, बाळू नितोने, सागर शाकपान यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक किशोर जुनगरे, उपनिरीक्षक मीनाक्षी काटोले व बीड जमादार यांच्यासह एकलव्य आपत्कालीन बचाव पथकाचे पांडुरंग तायडे व चमू यांनी घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य केले.
याच कुटुंबात अवघ्या महिन्याभरापूर्वी वच्छला नितोने यांचा मोठा मुलगा भास्कर नितोने यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आता वयोवृद्ध आईच्या मृत्यूमुळे या कुटुंबावर दुहेरी आघात झाला आहे. नितोने कुटुंबातील दोन मुलं आणि एक मुलगी असलेल्या या अल्पभूधारक कुटुंबावर उपजीविकेचे मोठे संकट आले आहे. कुटुंबीयांनी प्रशासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. मृतदेह अकोट ग्रामीण रुग्णालयात छिन्नविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.



