मुंबईकरांसाठी खुशखबर! वसई खाडी ते उत्तन डोंगरी रो-रो सेवा लवकरच सुरू होणार, ठाणे-नवी मुंबईकरांनाही होणार थेट फायदा

मुंबई : मुंबईकरांसाठी वाहतुकीचा एक नवा, जलद आणि पर्यावरणपूरक पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने वसई खाडीपासून नागला पोर्ट आणि उत्तन डोंगरी या ठिकाणी रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी जेट्टीच्या बांधकामास CRZ (कोस्टल रेग्युलेशन झोन) कडून मंजुरीही मिळाली आहे.
काय आहे रो-रो सेवा?
रो-रो सेवा म्हणजे गाड्या, दुचाकी, ट्रक, आणि प्रवासी वाहून नेणारी जलवाहतूक सेवा. यामध्ये प्रवासी त्यांची वाहने घेऊन फेरीवर चढू शकतात आणि इच्छित ठिकाणी पोहचल्यावर ती पुन्हा जमिनीवर उतरवू शकतात.
कुठे सुरू होणार आहे सेवा?
वसई खाडी – नागला पोर्ट
उत्तन डोंगरी – पश्चिम किनारपट्टी
या दोन्ही ठिकाणी 143 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद जेट्टी उभारली जाणार आहे. ही जेट्टी रो-रो सारख्या मोठ्या जलवाहतुकीसाठी योग्य असेल. याशिवाय पार्किंग सुविधा आणि सुरक्षा भिंतीचे कामही या प्रकल्पाचा भाग असेल.
कशामुळे होणार फायदा?
मुंबईतील वाहतूक भार कमी होईल
प्रवासाचा वेळ वाचेल, विशेषतः वसई, भायंदर, उत्तन भागातील नागरिकांसाठी
पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचेल, जलमार्ग कमी खर्चिक आणि पर्यावरणस्नेही
पर्यटनास चालना
ठाणे व नवी मुंबईकरांनाही दिलासा
MMB ने ठाणे व नवी मुंबई परिसरातही चार जेटी उभारण्याची योजना आखली आहे.
यामध्ये पुढील स्थानांचा समावेश:
वाशी
ऐरोली
मुलुंड मीठानगर
ठाणे – चेंदानी कोळीवाडा जवळचं मीठबंदर
मात्र, या प्रस्तावाला सध्या वन विभागाकडून मंजुरी मिळालेली नाही, त्यामुळे तो MCZMA (Maharashtra Coastal Zone Management Authority) कडे सादर केलेला नाही. मंजुरी मिळाल्यानंतर ठाणे ते नवी मुंबई आणि वसईपर्यंत जलमार्गाने थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
सेवा कधी सुरू होणार?
अद्याप अधिकृत सुरुवातीची तारीख जाहीर झालेली नाही. मात्र, CRZ मंजुरी मिळाल्यामुळे लवकरच जेट्टीचं काम सुरू होईल आणि पुढील काही महिन्यांत सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



