वेरूळ घाटात भीषण अपघात; ट्रक-कंटेनर धडक, दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर – वेरूळ घाटात आज (११ सप्टेंबर) भीषण अपघात झाला असून या अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. ट्रक आणि कंटेनरमध्ये आमनेसामने धडक होऊन मोठी दुर्घटना घडली. या अपघातात एक दुचाकी आणि एक स्विफ्ट कार देखील सामील झाली.
या भीषण अपघातात दुचाकीवर बसलेल्या दोन नागरिकांचा – एक पुरुष व एक महिलेसह – जागीच मृत्यू झाला. स्विफ्ट गाडीचेही मोठे नुकसान झाले असून अपघातानंतर वाहनांचे तुकडे रस्त्यावर विखुरले.
मिळालेल्या माहितीनुसार, वेरूळवरून येणारा कंटेनर आणि खुलताबादकडून येणारा ट्रक यांची समोरासमोर धडक झाली. हा संपूर्ण परिसर घाट विभागात असल्यामुळे अपघातानंतर कंटेनर रस्त्यावर आडवा पडला आणि संपूर्ण रस्ता जाम झाला. यामुळे वेरूळ-खुलताबाद मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
स्थानिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे. अपघातातील मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
हा अपघात पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांची गर्दी झाली असून या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



