पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या कामकाजावर आढावा, क्रीडा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे दिले निर्देश

सांगली : सर्वसामान्य नागरिकांपर्यंत दर्जेदार क्रीडा सुविधा पोहोचवण्यासाठी क्रीडा प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावेत, असे स्पष्ट निर्देश सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान पालकमंत्री म्हणाले, “ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक त्या क्रीडा सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात. विशेषतः पोलीस भरतीसाठी तसेच क्रीडा क्षेत्रातील करिअरसाठी इच्छुक युवक-युवतींना सरावासाठी आधुनिक सुविधा निर्माण करणे अत्यावश्यक आहे.”
त्यांनी बॅडमिंटन कोर्टचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या तसेच खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा आदेश दिला.
बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे:
४०० मीटर सिंथेटिक धावपट्टी आणि नैसर्गिक गवताचे फुटबॉल मैदान उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दर सूचीमध्ये नसलेल्या बाबींसाठी विशेष दरपत्रक मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता
जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलची रंगरंगोटी
क्रीडा संकुल परिसरात बुद्धिबळ भवन उभारणी
वास्तुविशारद नियुक्ती व ‘खेलो इंडिया’ प्रशिक्षण केंद्रासाठी प्रशिक्षकांची नेमणूक
राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू व खेळाच्या माध्यमातून नोकरी मिळवलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करण्याचे आदेश
बैठकीत जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी क्रीडा प्रकल्पांची सद्यस्थिती, येत्या काळातील योजना आणि अडथळ्यांविषयी सविस्तर सादरीकरण केले.
सांगली जिल्ह्यातील क्रीडा विकासासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली असून प्रशासनाच्या सहकार्याने प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.



