४ लाखांची सोन्याची चैनसह गणपती विसर्जन; घरी आल्यानंतर उघडकीस धक्कादायक प्रकार

आज अनंत चतुर्दशीचा दिवस… दहा दिवसांच्या उत्सवानंतर कोट्यवधी भाविक आपल्या गणरायाला भावपूर्ण निरोप देत आहेत. कोणी दीड दिवस, तर कोणी पाच, सात किंवा दहा दिवसांसाठी बाप्पा घरी आणतो. मात्र या निरोपाच्या दिवशी कर्नाटकातील एका कुटुंबासाठी हा दिवस अनपेक्षित धक्कादायक ठरला.
बंगळुरूच्या विजयनगरमधील दशरहळ्ळी सर्कल येथे राहणारे रामय्या आणि उमादेवी यांनी घरगुती बाप्पाचे विसर्जन केले. घरी परतल्यानंतर त्यांना कळलं की त्यांनी मूर्तीवर अर्पण केलेली खऱ्या सोन्याची चैन विसर्जनाआधी काढायची राहून गेली. किंमत होती तब्बल ४ लाख रुपये! ही बाब लक्षात येताच दाम्पत्य हादरलं आणि तातडीने तलावाजवळ धाव घेतली.
या सोनसाखळीच्या शोधासाठी तब्बल १० हजार लिटर पाणी उपसलं, ३०० मूर्तींचा गाळ खणून काढावा लागला. तलावात उतरण्यासाठी खास लोक नेमले गेले. एवढ्यावरच थांबता कामा नये म्हणून स्थानिक आमदार प्रिया कृष्णा यांनी स्वतः पुढाकार घेत मदतीसाठी माणसं पाठवली.
दरम्यान विसर्जन घाटावर मूर्ती पाण्यात सोडणाऱ्या तरुणाने मूर्तीच्या गळ्यात सोनसाखळी पाहिली होती, पण ती खोटी समजून दुर्लक्ष केले. नंतर या तरुणानेच पोलिसांना आणि स्थानिकांना मार्गदर्शन केले, ज्यामुळे शोधमोहीम यशस्वी ठरली. जवळपास दहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर ही चैन सापडली.
या प्रकरणामुळे परिसरात प्रचंड चर्चा रंगली. सोनसाखळी परत मिळाल्यानंतर रामय्या आणि उमादेवी यांनी दिलासा व्यक्त केला, तर स्थानिकांनीही समाधान मानलं. ही घटना भाविकांसाठी एक धडा असल्याचं अनेकांनी नमूद केलं.



