Accident NewsLatest News

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी;; बाहेरच अपघातात दोन बालकं चिरडली

मुंबई :गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या जल्लोषानंतर आज (शनिवार) राज्यभरात बाप्पाला निरोप दिला जात आहे. सकाळपासूनच मुंबईसह पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, कोल्हापूर, रत्नागिरी आदी शहरांसह संपूर्ण महाराष्ट्रात गणेश विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे.

गावोगावी आणि शहरांच्या रस्त्यांवर विसर्जन मिरवणुकांची धामधूम सुरू असून, ढोल-ताशांचा गजर, झांज-मृदंगाचे निनाद, पारंपरिक नृत्याविष्कार आणि गुलालाची उधळण यामुळे भक्तिमय वातावरण दुमदुमले आहे. “गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या” अशा घोषणांनी प्रत्येक गल्ली-चौक दणाणून गेला आहे.

मुंबईतील लालबागचा राजा, गणेशगल्लीतला राजा, गिरगावचा राजा आणि अंधेरीचा राजा यांसारख्या नामांकित मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांना भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. भक्तगण डोळ्यांत पाणी आणून आपल्या बाप्पाला निरोप देताना दिसत आहेत.

मात्र, या उत्साहातच एक दुर्दैवी घटना घडली आहे. लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अज्ञात वाहनाने दोन चिमुकल्यांना चिरडले. या अपघातात २ वर्षांची चंद्रा वजणदार हिचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा ११ वर्षीय भाऊ शैलू वजणदार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर परळ येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली.

राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून, वाहतूक व्यवस्थापनासाठी स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत. मुंबईत समुद्रकिनाऱ्यावर आणि तलावांवर लाखो भाविक बाप्पाला निरोप देण्यासाठी दाखल झाले आहेत. पर्यावरणपूरक विसर्जनासाठी अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

यंदा अनेक मंडळांनी सामाजिक संदेश देणाऱ्या सजावट व देखाव्यांद्वारे समाजप्रबोधनाचा प्रयत्न केला. कोरोनानंतर प्रथमच निर्बंधमुक्त गणेशोत्सव झाल्याने या वर्षी राज्यभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button