Latest Newsmelghat

धारणीतील सोनाबर्डी ग्रामपंचायतील अपूर्ण शौचालय बांधकामावरून गैरव्यवहार उघड

धारणी तालुक्यातील ग्रामपंचायतींचा कारभार वारंवार चर्चेत राहतो. मेळघाटातील काही ग्रामपंचायतींमध्ये मागील काळात झालेल्या प्रशासकीय त्रुटी आणि आर्थिक अनियमिततेमुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तत्कालीन सचिवांच्या गैरव्यवस्थापनामुळे अनेक योजनांचे कामे अपूर्ण अवस्थेत पडून राहिले असून, त्याचा थेट परिणाम गावकऱ्यांवर होत आहे.

याचे ठळक उदाहरण म्हणजे, धारणी तालुक्यातील खाऱ्या टेब्रु ग्रामपंचायतीअंतर्गत येणारे सोनाबर्डी गाव. येथे २०२०-२१ या वर्षात ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत सार्वजनिक शौचालय बांधकामाला सुरुवात झाली. शौचालयांचे स्ट्रक्चर उभारण्यात आले असले तरी आतमध्ये सीट बसविण्यात आलेल्या नाहीत, दरवाजे लावले गेलेले नाहीत आणि पाणीपुरवठ्याची सोयही केलेली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, प्रत्यक्ष काम अपूर्ण असतानाही त्याचे संपूर्ण बिल काढल्याची माहिती समोर आली आहे.

फक्त शौचालय नव्हे, तर इतरही अनेक योजनांमध्ये अनियमितता जाणवते. पेसा निधीचा योग्य वापर न होणे, घनकचरा व्यवस्थापनावर खर्च होऊनही प्रत्यक्षात काम न होणे, तसेच लाखो रुपये खर्चूनही पाणीपुरवठा योजनांचा लाभ न मिळणे – अशा समस्या सतत उघडकीस येत आहेत. गावकऱ्यांनी पाणीपुरवठ्यासाठी अजूनही टँकरवर अवलंबून राहावे लागते, हे विशेष धक्कादायक आहे.

यामुळे स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये असंतोष असून, त्यांनी वारंवार तक्रारी नोंदवल्या आहेत. या गंभीर अनियमिततेबाबत गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, अशी मागणी होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button