धारणी तालुक्यात नर्सेसचे काम बंद आंदोलन सुरू

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात आरोग्यव्यवस्था हादरली आहे. कारण आरोग्य सेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या नर्सेसनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. शासन दरबारी अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या अखेर रस्त्यावर आल्या असून नर्सेसनी थेट आरोग्य सेवेतून हात झटकला आहे.
नर्सेस युनियनने समायोजन आणि वेतन सुसूत्रीकरणाच्या प्रमुख मागण्यांवर ठाम भूमिका घेतली आहे. या मागण्यांकडे सरकारने सातत्याने दुर्लक्ष केल्याने शेकडो नर्सेसनी आपल्या कामाचा त्याग करून जोरदार आंदोलन सुरू केले आहे.
भर पावसात भिजत, घोषणा देत आंदोलन सुरूच आहे. नर्सेसनी स्पष्ट केले आहे की, “मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही.” त्यांच्या या निर्धारामुळे प्रशासनावर प्रचंड दबाव वाढला आहे.
या आंदोलनाचा थेट परिणाम धारणी तालुक्यातील आरोग्य सेवांवर होताना दिसत आहे. शासकीय दवाखाने ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली असून, रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नर्सेसनी इशारा दिला आहे की, “जर मागण्या त्वरीत मान्य केल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.”



