नागपूरमध्येही १५ ऑगस्टला चिकन, मटणाची दुकानं बंद राहणार, महापालिकेचा वादग्रस्त निर्णय

कल्याण डोंबिवली महापालिकेने घेतलेला वादग्रस्त निर्णय मागे घेण्याची मागणी जोर धरत असतानाच नागपूर महापालिकेने देखील तशाच प्रकारचा निर्णय घेऊन स्वातंत्र्यदिनालाच नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणल्याचा सूर मांसाहारीप्रेमी नागरिकांमधून उमटतो आहे.
नागपूर : कल्याण डोंबिवली महापालिकेपाठोपाठ नागपूरमध्येही स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला चिकन, मटणाची दुकानं बंद राहणार आहेत. नागपूर महापालिकेने तसे परिपत्रक काढले आहे.
चिकन, मटणाची दुकाने बंद ठेवण्यासाठी नागपूर महानगर पालिका लवकरच विक्रेत्यांना नोटीस पाठवणार आहे. महापालिकेच्या या निर्णयाला चिकन आणि मटण विक्रेत्यांकडून जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे.
स्वातंत्र्यदिनी चिकन आणि मटणाची दुकाने बंद ठेवा, असे आदेश कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिकेने काढले. त्यानंतर राज्यभरातील कुरेशी आणि खाटिक समाजाने कडाडून विरोध केला. राजकीय पक्ष देखील महानगर पालिकांच्या निर्णयाला विरोध करीत होते. हा वादग्रस्त निर्णय मागे घेण्याची मागणी जोर धरत असतानाच नागपूर महापालिकेने देखील तशाच प्रकारचा निर्णय घेऊन स्वातंत्र्यदिनालाच नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणल्याचा सूर मांसाहारीप्रेमी नागरिकांमधून उमटतो आहे.



