Accident NewsLatest NewsNagpur

मनसर-रामटेक मार्गावर पुन्हा अपघात; टिप्परने चिरडल्याने युवकाचा मृत्यू, नागरिकांचा रास्ता रोको…

मनसर: मनसर-रामटेक मार्गावर निष्काळजी वाहनचालकामुळे पुन्हा एकदा एका निष्पाप युवकाला जीव गमवावा लागला आहे. महानूभाव पंथ आश्रमाजवळ भरधाव टिप्परने एका तरुणाला चिरडले. उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन छेडून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

काय आहे नेमकी घटना?

8 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास, महानूभाव पंथ आश्रमाजवळ रस्ता ओलांडत असताना केशव सीताराम कोळापे (वय अंदाजे 25) या युवकाला भरधाव वेगात येणाऱ्या टिप्परने धडक दिली. या अपघातात टिप्परचे चाक केशवच्या डाव्या हातावरून गेल्याने त्याचा हात गंभीर जखमी झाला. घटनेनंतर टोल प्लाझाचे डॉक्टर गजभिये यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी त्याला नागपूर मेडिकलमध्ये हलवण्यात आले. मात्र, 9 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता उपचारादरम्यान केशवचा मृत्यू झाला.

नागरिकांचा संतप्त उद्रेक

या अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी रस्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे मनसर-रामटेक मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलक अपघातांसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आणि अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करत होते.

प्रशासनाचे आश्वासन

घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तहसीलदार रमेश कोळपे यांनीही घटनास्थळी येऊन आंदोलकांशी संवाद साधला. त्यांनी आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जवळपास दीड तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला. मनसर-रामटेक मार्गावर अशा अपघातांचा वाढता सिलसिला वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button