“मिशन फुटपाथ फ्रीडम” अंतर्गत अतिक्रमणावर कारवाई – बडनेऱ्यातील अंडा राईस व वेलकम धाब्यावर मनपाची मोठी धडक

अमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या दक्षिण झोन क्रमांक ४ अंतर्गत बडनेरा भागातील अतिक्रमण हटवण्यासाठी सकाळी ११:३० वाजता महत्त्वाची कारवाई करण्यात आली. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या आदेशानुसार राबविण्यात आलेल्या “मिशन फुटपाथ फ्रीडम” या मोहिमेच्या अनुषंगाने ही कारवाई पार पडली.
नेमानी गोडाऊन समोर मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करत चालवण्यात येणारे सार्थक अंडा राईस धाबा व वेलकम धाबा यांच्या कॅन्टीन व नाश्त्याच्या दुकानांसह लोखंडी पानठेले यावर मनपाच्या पथकाने कारवाई केली. सदर अतिक्रमणामुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत होत्या.
महानगरपालिकेच्या पथकाने संबंधित दुकाने हटवून रस्त्यावरचा अडथळा दूर केला. कारवाई दरम्यान पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये.
आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी स्पष्टपणे सांगितले की, “अवैध अतिक्रमण कोणतेही असो, त्यावर कठोर कारवाई केली जाईल. सार्वजनिक रस्ते आणि पादचाऱ्यांसाठी असलेल्या जागा व्यापणाऱ्यांना मनपाने माफ केले जाणार नाही.”
महानगरपालिकेच्या या कारवाईने सार्वजनिक जागांवरील अतिक्रमण हटवण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
या कारवाई दरम्यान अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चावरे, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.



