अमरावती महानगरपालिकेच्या झोन क्र. ३ मध्ये वृक्षारोपण व स्वच्छतेबाबत जनजागृती मोहीम

अमरावती : अमरावती महानगरपालिका झोन क्रमांक ३ अंतर्गत दस्तूरनगर येथील प्रभाग क्र.८ मधील सूर्योदय कॉलनी, काँग्रेस नगर रोड, तसेच प्रभाग क्र.९ मधील पारधी कॉलनी समोरील SRPF कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत स्वच्छता व पर्यावरण रक्षणाचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
या ठिकाणी काही नागरिकांकडून नियमितपणे ओला व सुका कचरा रस्त्याच्या कडेला फेकण्यात येत होता. यामुळे परिसरात अस्वच्छता वाढत होती. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी “कचरा घंटागाडीमध्येच टाका, अन्यथा ₹१०००/- दंड आकारण्यात येईल” असा स्पष्ट इशारा देणारे सूचना फलक लावण्यात आले.
या मोहिमेला सामाजिक कार्यकर्ते गोविंद कसाट, स्वच्छता निरीक्षक, सफाई कामगार व स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सर्वांच्या सहभागातून या ठिकाणी वृक्षारोपण करून परिसर सुशोभीकरणाचा उपक्रम राबविण्यात आला. स्थानिक नागरिकांना स्वच्छतेबाबत जागरूक करण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले.
सदर उपक्रमामुळे परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृती झाली असून, नागरिकांनीही कचरा ठराविक ठिकाणीच टाकण्याचा निर्धार केला आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून असे उपक्रम भविष्यातही नियमित राबविले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.



