धारणी नगर पंचायत कार्यालयातील शौचालयात घाणीचे साम्राज्य; स्थानिक नागरिकांचा संताप

धारणी : मेळघाटातील निसर्गरम्य धारणी शहराची ओळख केवळ कागदावरच उरल्याचे चित्र सध्या दिसत आहे. धारणी नगरपंचायत कार्यालयाच्या अगदी जवळच असलेल्या सार्वजनिक शौचालयात घाणीचे साम्राज्य पसरले असून, या दुर्गंधीमुळे कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, सुशिक्षित अधिकारी आणि कर्मचारी असूनही त्यांना या गंभीर समस्येची दखल घ्यावीशी वाटत नाही, असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
नगरपंचायत कार्यालयाजवळील शौचालयाची ही दुरवस्था पाहता, शहरातील इतर सार्वजनिक शौचालयांची काय अवस्था असेल, हा प्रश्न उपस्थित होत आहे. या अस्वच्छतेमुळे धारणीच्या स्वच्छ आणि निसर्गरम्य प्रतिमेला धक्का लागत आहे.
कार्यालयातील कामकाजावरही परिणाम:
शौचालयाच्या या दुरवस्थेसोबतच, धारणी नगरपंचायत कार्यालयाचे कामकाजही रखडलेले असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. कोणत्याही माहितीसाठी महिनोन्महिने वाट पाहावी लागते. त्यातच, मुख्याधिकारी केवळ दोन दिवसच धारणीत उपस्थित असल्याने स्थानिक नागरिकांची कामे खोळंबत आहेत.
या गंभीर समस्येकडे आमदार केवलराम काळे आणि जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी धारणीकर करत आहेत. धारणीला स्वच्छ आणि कार्यक्षम बनवण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.



