AmravatiLatest News

वडाळी गार्डन व तलाव परिसराचा सर्वांगीण विकास; आधुनिक गार्डनसाठी आराखडा तयार – आयुक्त सौम्या शर्मा चांडक

अमरावती : अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज वडाळी गार्डन व तलाव परिसराची सखोल पाहणी करून परिसर स्वच्छ, सुरक्षित व पर्यावरणपूरक करण्यासाठी ठोस निर्देश दिले. यासोबतच गार्डनला आधुनिक रूप देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नव्या आराखड्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

शहरातील हरित व नैसर्गिक ठिकाणांचे सुशोभीकरण व सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने वडाळी परिसर हा महत्त्वाचा केंद्रबिंदू असून, नागरिकांना आरोग्यदायी व आकर्षक सार्वजनिक जागा मिळावी या हेतूने हा प्रकल्प हाती घेण्यात येत आहे.

तलाव परिसरात सुधारणा:
तलावामधील पाणी स्वच्छ राखणे, प्लास्टिक व इतर कचऱ्यापासून संरक्षण करणे, वॉकिंग ट्रॅक तयार करणे, सुरक्षेसाठी रेलिंग बसविणे व प्रकाशयोजना सशक्त करणे यावर आयुक्तांनी भर दिला. यासाठी जनजागृतीसह नियोजनबद्ध उपाययोजना राबवण्याचे आदेशही त्यांनी दिले.

आधुनिक गार्डनसाठी विशेष आराखडा:
महानगरपालिकेने गार्डनच्या नुतनीकरणासाठी तयार केलेल्या आधुनिक आराखड्यात पुढील गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे:

  • ओपन जिम व योगा प्लॅटफॉर्म
  • स्वच्छ व सुलभ टॉयलेट सुविधा
  • आकर्षक प्रवेशद्वार व माहिती फलक
  • नव्या फुलझाडांची व सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड
  • लहान मुलांसाठी खेळाचे साहित्य
  • वरिष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था

शासनाकडे निधीची मागणी:
या आधुनिक गार्डन प्रकल्पासाठी आवश्यक निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. निधी मंजूर होताच कामांना गती देण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. “वडाळी गार्डन हे अमरावतीच्या हिरवळीत भर घालणारे आणि नागरिकांसाठी एक ‘आयकॉनिक ग्रीन स्पेस’ ठरेल,” असा विश्वास आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी व्यक्त केला.

नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा:
“शहरातील प्रत्येक सार्वजनिक जागा ही नागरिकांची आहे. त्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि आनंदासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. वडाळी गार्डनचा विकास करताना जनतेच्या सूचना, अपेक्षा आणि गरजा समजून घेऊनच काम केले जाईल,” असेही त्यांनी नमूद केले.

या पाहणीवेळी शहर अभियंता रवींद्र पवार, सहायक आयुक्त नितीन बोबडे, प्रकल्प अभियंता राजेश आगरकर, प्रकाश विभागाचे उपअभियंता शरद तिनखडे, अभियंता चिन्मय देशपांडे, जेष्ठ स्वच्छता निरीक्षक कुंदन हडाले, स्वच्छता निरीक्षक व उद्यान विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

महानगरपालिकेच्या या पुढाकारामुळे वडाळी परिसराचा चेहरामोहरा बदलणार असून, लवकरच नागरिकांना एक सुशोभित, हरित आणि आधुनिक सार्वजनिक जागा मिळणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button