धारणी बस स्थानकात बस बंद, प्रवासी हैराण; ‘लालपरी’च्या इंजिनावर गंभीर प्रश्नचिन्ह

धारणी : 17 मे रोजी खंडवा ते अमरावती धावणारी एसटी बस (क्र. MH 11 9230) पुन्हा एकदा मार्गामध्ये बिघडल्याची घटना समोर आली आहे. धारणी बस स्थानकावर बस अचानक बंद पडल्याने प्रवाशांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात संतापाचे वातावरण पसरले.
प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
धारणी येथे बस बंद पडल्याची माहिती मिळताच आमचे प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले आणि प्रवाशांची कैफियत जाणून घेतली. प्रवाशांनी सांगितले की, बसचा बाह्य देखावा अगदी नव्यासारखा वाटतो, सीट्स नवीन आहेत, मात्र इंजिन वारंवार बिघडते. “वरून चमचमीत, आतून ढासळलेली” अशीच अवस्था या बसची आहे, असे प्रवाशांनी उपहासात्मक भाषेत सांगितले.
बस बंद पडण्यामागे जुने इंजिन?
या बसमध्ये बाहेरून सर्व काही नवीन असल्याचं चित्र आहे. मात्र, बस वारंवार बिघडते हे पाहता, बसमध्ये जुनं इंजिन बसवण्यात आलं आहे का? असा प्रश्न प्रवासी आणि स्थानिक उपस्थित करत आहेत. एसटी महामंडळाच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच हा प्रकार घडतोय का? अशाही चर्चा बसस्थानक परिसरात रंगल्या.
मेळघाटातील प्रवाशांची रोजचीच परीक्षा
मेळघाटातील दुर्गम भागात जाणाऱ्या लालपरींची ही स्थिती नविन नाही. सतत बिघाड होणाऱ्या बसेस, रखडलेली वेळापत्रकं आणि दुर्लक्षित दुरुस्तीमुळे प्रवाशांना तासनतास रस्त्यावर थांबावं लागतं. यामुळे विद्यार्थी, रुग्ण, कामगार यांचा खोळंबा होत असून त्यांचे मोठे हाल होत आहेत.



