परीक्षेत नापास करण्याची धमकी देत विद्यार्थिनीचा प्राध्यापकाकडून लैंगिक छळ; ११ महिने अत्याचार, आरोपीला अटक!

बीडमध्ये होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार; ‘पाच वर्षे एकाच वर्गात बसवेन’ अशी धमकी, उपचाराच्या बहाण्याने गैरवर्तन केल्याचा आरोप
बीड : शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी धक्कादायक घटना बीड शहरातून समोर आली आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय विद्यार्थिनीचा महाविद्यालयातील प्राध्यापकाने तब्बल ११ महिने लैंगिक छळ केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. परीक्षेत नापास करण्याची तसेच पाच वर्षे एकाच वर्गात बसवून ठेवण्याची धमकी देत आरोपी प्राध्यापकाने विद्यार्थिनीचे शोषण केल्याचा आरोप आहे. अखेर सततच्या त्रासाला कंटाळून पीडित विद्यार्थिनीने पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी प्राध्यापकाला अटक केली आहे.
डॉ. अनिस अहमद असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्राध्यापकाचे नाव आहे. संबंधित प्राध्यापक होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असून, पीडित विद्यार्थिनी याच महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. आरोपीने आपल्या पदाचा आणि शैक्षणिक अधिकाराचा गैरवापर करून विद्यार्थिनीचा छळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्राध्यापकाने विद्यार्थिनीला परीक्षेत कमी गुण देऊन नापास करण्याची धमकी दिली होती. एवढेच नव्हे, तर या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास पाच वर्षे एकाच वर्गात बसवून ठेवेन, अशी धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येण्याच्या भीतीने विद्यार्थिनीवर मानसिक दबाव निर्माण झाला होता.
उपचाराच्या बहाण्याने गैरवर्तन; ११ महिन्यांत चार वेळा छळ
उपचाराच्या बहाण्याने आरोपी प्राध्यापकाने विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. गेल्या सुमारे ११ महिन्यांच्या कालावधीत चार वेळा तिचा लैंगिक छळ झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे मानसिक त्रास सहन करणाऱ्या विद्यार्थिनीने अखेर धैर्य दाखवत शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले आणि संपूर्ण प्रकार पोलिसांसमोर मांडला.
विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित आरोपी प्राध्यापकाविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.



