citynewsFarmersCrisisGondia

खजरी आदिवासी सोसायटीच्या धान खरेदी केंद्रात शेतकऱ्यांच्या धानाला सुरक्षा नाही? ८० कट्ट्यांपैकी १० कट्टे कमी आढळल्याचा आरोप!

वर्षभरापासून सीसीटीव्ही कॅमेरे बंद; धान खरेदी केंद्र प्रमुखाचे उर्मट उत्तर दिल्याचा शेतकऱ्याचा दावा, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीची मागणी

गोंदिया : शेतकऱ्यांच्या धानाला योग्य हमीभाव मिळावा आणि त्यांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी शासनाकडून आधारभूत किंमत धान खरेदी योजना राबविली जाते. मात्र, याच धान खरेदी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांच्या मालाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रातील कारभारावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. डोंगरगाव येथील एका शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेल्या ८० कट्टे धानापैकी वजनाच्या वेळी १० कट्टे धान कमी आढळल्याचा आरोप केला आहे. त्यातच सुरक्षेसाठी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे मागील वर्षभरापासून बंद असल्याची माहिती समोर आल्याने या केंद्राच्या व्यवस्थापनावर संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरगाव येथील शेतकरी मोहन तुलाराम खोटेले यांनी २५ नोव्हेंबर रोजी खजरी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रात विक्रीसाठी ८० कट्टे धान आणून ठेवले होते. मात्र, २६ नोव्हेंबर रोजी धानाचे वजन करण्यात आले असता १० कट्टे धान कमी भरल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या प्रकाराबाबत शेतकरी मोहन खोटेले यांनी केंद्र प्रमुख विशाल राऊत यांच्याकडे विचारणा केली असता, ‘तुमच्या मालाची जबाबदारी आमची नाही,’ असे उर्मट उत्तर मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शेतकरी आपला घाम गाळून पिकविलेला धान विक्रीसाठी केंद्राच्या आवारात आणतो. अशा परिस्थितीत त्याच्या मालाच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे.

या प्रकरणातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे धान खरेदी केंद्राच्या आवारात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असतानाही ते मागील एक वर्षापासून बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. लाखो रुपयांचा धान साठवून ठेवण्यात येणाऱ्या केंद्रात सीसीटीव्ही यंत्रणाच कार्यरत नसेल, तर शेतकऱ्यांच्या मालावर लक्ष कोण ठेवणार? धानाच्या आवक-जावक प्रक्रियेवर नियंत्रण कसे ठेवले जाते? तसेच एखादी चोरी किंवा गैरप्रकार घडल्यास त्याचा पुरावा कसा मिळणार, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

शेतकऱ्यांच्या मालाची सुरक्षितता ही धान खरेदी केंद्राच्या व्यवस्थापनासाठी महत्त्वाची बाब असताना सीसीटीव्ही कॅमेरे वर्षभरापासून बंद असणे ही गंभीर बाब मानली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन सखोल चौकशी करण्याची गरज आहे. संबंधित दिवशी झालेल्या धानाच्या वजनाची नोंद, आवक-जावक रजिस्टर, वजनकाट्याची अचूकता आणि शेतकऱ्याच्या धानाच्या साठ्याची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेरे बंद असण्यामागील नेमके कारण काय, ते दुरुस्त करण्यासाठी वर्षभरात कोणती कार्यवाही करण्यात आली, तसेच शेतकऱ्याच्या धानाच्या तफावतीला जबाबदार कोण, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे. संबंधित केंद्र व्यवस्थापनाची बाजू आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा खुलासा समोर येणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

एकीकडे शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी हमीभावाने धान खरेदी करत असल्याचा दावा करते, तर दुसरीकडे खरेदी केंद्रातच शेतकऱ्यांच्या मालाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल, तर या व्यवस्थेवर विश्वास कसा ठेवायचा? शेतकऱ्यांच्या धानाचे संरक्षण करण्याऐवजी जबाबदारी झटकणाऱ्या व्यवस्थेला जाब विचारणार कोण? असा संतप्त सवाल आता शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.

सिटी न्यूज | सुधीर शिवणकर, गोंदिया

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button