कॉटन मार्केटमधील नाल्यात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले! दारूच्या नशेत वादातून ‘टार्झन’ची हत्या; दोघांना अटक

डोक्यात काठीने वार करून हत्या केल्याचा पोलिसांचा संशय; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नाल्यात फेकला, सीसीटीव्ही फुटेज आणि चौकशीतून गणेशपेठ पोलिसांकडून घटनेचा उलगडा
नागपूर : शहरातील कॉटन मार्केट परिसरात रेल्वेच्या जागेलगत असलेल्या नाल्यात आढळलेल्या अनोळखी मृतदेहाच्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका बेघर व्यक्तीची डोक्यात काठी मारून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात समोर आला आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह नाल्यात फेकून दिल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी दोघांना अटक केली असून, अन्य बाबींचा तपास सुरू आहे. मृत व्यक्तीची अधिकृत ओळख अद्याप पटलेली नसून, परिसरात त्याला ‘टार्झन’ या नावाने ओळखले जात होते.
काही दिवसांपूर्वी कॉटन मार्केट परिसरातील रेल्वेच्या जागेलगत असलेल्या नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच गणेशपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह नाल्यातील पाण्यात पडलेल्या अवस्थेत होता. प्राथमिक पाहणीदरम्यान मृतदेहावर जखमांच्या खुणा दिसून आल्याने पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली.
अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर
नाल्यात पाण्यामध्ये पडलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाची मदत घेण्यात आली. त्यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आला. सुरुवातीला मृत व्यक्तीची ओळख पटत नसल्याने गणेशपेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यू क्रमांक ११७/२०२६ नोंदवून तपास सुरू केला होता.
शवविच्छेदन अहवालातून हत्येचा संशय बळावला
शवविच्छेदन अहवालात डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे हा नैसर्गिक मृत्यू नसून घातपात असल्याचा संशय बळावला. पोलिसांनी त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि संशयितांच्या हालचालींच्या आधारे तपासाला दिशा मिळाली.
दारूच्या नशेत वाद; काठीने डोक्यावर वार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री चार बेघर व्यक्ती एकत्र दारू पीत असताना त्यांच्यात वाद झाला. या वादातून धर्मा नावाच्या व्यक्तीने टार्झनच्या डोक्यावर काठीने वार केल्याची माहिती तपासात समोर आली. या मारहाणीत टार्झनचा मृत्यू झाल्यानंतर चौघांनी मिळून मृतदेह नाल्यात टाकल्याचे पोलिस तपासात उघड झाल्याचे सांगण्यात आले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमधून संशयितांचा माग
घटनेचा उलगडा करण्यासाठी गणेशपेठ पोलिसांनी कॉटन मार्केट परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यामध्ये चार व्यक्तींच्या हालचाली दिसून आल्या. तसेच ताब्यात घेतलेल्या व्यक्तींच्या चौकशीतून महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. तपासादरम्यान किशोर शंभू जरकर, इस्लाम अहमद आणि ऋषिकांत प्रभाकर जामगवा यांची नावे समोर आल्याची माहिती आहे.
दोघांना अटक; पुढील तपास सुरू
या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे. उर्वरित संशयितांची भूमिका आणि घटनेतील सहभागाबाबत तपास सुरू आहे. मृत व्यक्तीची अधिकृत ओळख पटविण्याचे प्रयत्नही पोलिसांकडून सुरू आहेत.
गणेशपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल तवाडे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास गणेशपेठ पोलीस करीत आहेत.



