शेतकरी, दिव्यांग आणि दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांवर हिवाळी अधिवेशनात बच्चू कडू आक्रमक होणार!

७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात पाणीपुरवठा योजनांसह शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर तारांकित प्रश्न; मायक्रो फायनान्स कंपन्या आणि अवैध सावकारीविरोधात लक्षवेधी मांडणार
अमरावती : येत्या ७ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शेतकरी, दिव्यांग आणि दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांवर शिवसेना नेते तथा विधान परिषद आमदार बच्चू कडू सरकारला जाब विचारणार आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या, दिव्यांगांचे प्रलंबित प्रश्न आणि दुष्काळी परिस्थितीत रखडलेल्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याबाबत ते तारांकित प्रश्न मांडणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स कंपन्या आणि सावकारांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचा मुद्दाही बच्चू कडू यांनी उपस्थित केला. कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या नागरिकांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी ते अधिवेशनात करणार आहेत. मायक्रो फायनान्स कंपन्या आणि सावकारांच्या कारभाराविरोधात विधान परिषदेत लक्षवेधी प्रश्न उपस्थित करून या गंभीर विषयाकडे सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील अतिक्रमण हटविण्यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष बंडूभाऊ घोम यांनी गेल्या दोन दिवसांपासून बाजार समितीसमोर उपोषण सुरू केले आहे. बाजार समितीसमोरील अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी तातडीने टिनशेड उभारण्यात यावे, तसेच विदर्भ मिलसमोरील अपघातास कारणीभूत ठरत असल्याचा आरोप असलेला धोकादायक डिव्हायडर हटविण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या त्यांनी केल्या आहेत.
या उपोषणाची दखल घेत आमदार बच्चू कडू यांनी उपोषणस्थळी भेट देऊन बंडूभाऊ घोम यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्या जाणून घेत सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
एकीकडे विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात शेतकरी, दिव्यांग, दुष्काळग्रस्त आणि सावकारीच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरण्याची तयारी बच्चू कडू यांनी दर्शवली आहे, तर दुसरीकडे स्थानिक प्रश्नांवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. आता अधिवेशनात ते कोणते मुद्दे प्रभावीपणे मांडतात आणि स्थानिक मागण्यांवर प्रशासनाकडून कितपत कार्यवाही होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



