Amravaticitynewslatestnewss breakingnews

एमएसपीचा कायदा करा, एसआयआर प्रक्रिया रद्द करा; संयुक्त किसान मोर्चा व ‘आम्ही अमरावतीकर लोक’ यांचे पंतप्रधानांना निवेदन

संविधान दिनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला साकडे; शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी, मतदारांची नावे वगळल्याचा आरोप करत निवडणूक आयुक्तांवर कारवाईची मागणी

अमरावती : शेतकऱ्यांना शेतमालासाठी किमान आधारभूत किंमत अर्थात एमएसपीचा कायदेशीर हमीभाव द्यावा आणि एसआयआर (SIR) प्रक्रिया रद्द करावी, या प्रमुख मागण्यांसाठी संविधान दिनी संयुक्त किसान मोर्चा आणि ‘आम्ही अमरावतीकर लोक’ यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यानिमित्ताने जिल्हाधिकारी अमरावती यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करण्यात आले.

देशपातळीवर संयुक्त किसान मोर्चा आणि एसआयआरविरोधी राष्ट्रीय व्यासपीठ ‘पीपल अगेन्स्ट एसआयआर’ यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर संविधान दिनी आंदोलनाचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार अमरावतीमध्येही विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत केंद्र सरकारसमोर आपल्या मागण्या मांडल्या.

निवेदनात म्हटले आहे की, २६ नोव्हेंबर २०२० रोजी केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी, शेतमजूर आणि कामगार संघटनांनी दिल्ली येथे ऐतिहासिक आंदोलन सुरू केले होते. तब्बल ३८६ दिवस चाललेल्या या आंदोलनानंतर सरकारने शेतमालाला किमान आधारभूत किंमत (एमएसपी) देण्यासाठी कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने एमएसपीचा कायदा करावा, अशी मागणी करण्यात आली.

यासोबतच एसआयआर प्रक्रियेवरही निवेदनातून आक्षेप नोंदविण्यात आला. या प्रक्रियेमुळे देशातील १३ कोटींपेक्षा अधिक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. मृत आणि दुबार मतदारांची नावे वगळता इतर सर्व पात्र मतदारांची नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करून त्यांचा मतदानाचा अधिकार बहाल करावा, तसेच केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.

या निवेदनप्रसंगी संयुक्त किसान मोर्चाचे निमंत्रक अशोक सोनारकर, ‘आम्ही अमरावतीकर लोक’चे समन्वयक प्रा. साहेबराव विदळे, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे, सुशील ढोले, अशोकराव राऊत, सुधीर बारबुदे, भारतीय खेत मजदूर युनियनचे सुनील घटाळे, जयेंद्र भोगे, प्रतिभा मेश्राम, बहुजन संघर्ष समितीचे प्रा. संतोष यावले, अनिल वानखडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे आर्थिक हक्क आणि नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारने या मागण्यांवर गांभीर्याने विचार करावा, अशी भूमिका संयुक्त किसान मोर्चा आणि ‘आम्ही अमरावतीकर लोक’ यांच्या प्रतिनिधींनी मांडली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button