सोशल मीडियावर पोलिसांना डिवचणारा गुटखा व्यावसायिक अखेर जेरबंद! तीन महिन्यांपासून होता फरार

माल मिलेगा तो पुष्पा नहीं मिलेगा…’ स्टेटस ठेवून पोलिसांना दिले होते आव्हान; रिसोड येथील राहत्या घरातून स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
वाशिम : प्रतिबंधित गुटख्याच्या व्यवसायात नाव समोर आल्यानंतर तब्बल तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा गुटखा व्यावसायिक विजय तापडिया अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. सोशल मीडियावर ‘माल मिलेगा तो पुष्पा नहीं मिलेगा, पुष्पा मिलेगा तो माल नहीं मिलेगा…’ अशा आशयाचे स्टेटस ठेवून पोलिसांना आव्हान देत असल्याचा आरोप असलेल्या तापडियाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रिसोड येथील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.
वाशिम जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्याचा लाखो रुपयांचा साठा जप्त करण्यात आल्यानंतर या प्रकरणात विजय तापडियाचे नाव समोर आले होते. कारवाईनंतर तो फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस सातत्याने प्रयत्न करीत होते. मात्र, पोलिसांना चकवा देत तो अटकेपासून दूर राहत होता. याचदरम्यान सोशल मीडियावर विविध स्टेटस ठेवून तो पोलिसांना डिवचत असल्याची माहिती समोर आली होती.
दरम्यान, तापडियाने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी हालचाली वेगवान केल्या. गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रिसोड येथील त्याच्या घरावर लक्ष केंद्रित करून सापळा रचला आणि अखेर त्याला ताब्यात घेतले.
पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. ताब्यात घेतलेल्या विजय तापडियाला पुढील तपासासाठी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
बाईट : योगेश धोत्रे, सहायक पोलीस निरीक्षक, वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन



