citynewsMaharashtraNagpurNagpur graminNagpurCrimeNagpurPoliceramtek

शेतातील विद्युत कुंपणात अडकून वाघाचा मृत्यू; शेतकऱ्याविरुद्ध वनगुन्हा दाखल!

पिकांच्या संरक्षणासाठी लावलेल्या जीआय तारांमध्ये सोडला होता अवैध विद्युत प्रवाह; मृत वाघाला शेतात पुरल्याची कबुली, ट्रॅक्टरसह साहित्य जप्त

रामटेक : सिटी न्यूज प्रतिनिधी – अजय मेहरकुळे

वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतात लावलेल्या तारांच्या कुंपणात अवैधरीत्या विद्युत प्रवाह सोडल्याने वाघाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रामटेक वनपरिक्षेत्रातील मौजा गुगलडोह येथे उघडकीस आली आहे. वाघाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह शेतात पुरल्याची कबुली संबंधित शेतकऱ्याने वनविभागाच्या चौकशीत दिली. या प्रकरणी वनविभागाने संबंधित शेतकऱ्याविरुद्ध वनगुन्हा दाखल केला असून, विद्युत प्रवाह सोडण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य आणि ट्रॅक्टर जप्त केले आहे.

नागपूर वनविभागांतर्गत रामटेक वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र रामटेक आणि नियतक्षेत्र घोगरा येथे हा प्रकार घडला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने मौजा गुगलडोह येथे जाऊन रविशंकर रामधर जिझोते (वय ४८, व्यवसाय शेती) यांची चौकशी केली. या चौकशीदरम्यान त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ नोव्हेंबर रोजी आपल्या शेतातील भूमापक क्रमांक २३१ मध्ये खुंट्या गाडून जीआय तारांचे कुंपण तयार केले होते. वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी तयार केलेल्या या कुंपणात त्यांनी अवैधरीत्या विद्युत प्रवाह सोडला होता.

दरम्यान, २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते ८.३० वाजताच्या सुमारास शेतात पाहणी करण्यासाठी गेले असता कुंपणात एक वाघ मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर भीतीपोटी वाघाचा मृतदेह विहिरीजवळील शेताच्या धुऱ्यावर खड्डा खोदून पुरल्याची कबुली त्यांनी वनविभागाला दिली. या माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पुरलेला वाघाचा मृतदेह बाहेर काढत ताब्यात घेतला.

ट्रॅक्टरसह विद्युत कुंपणाचे साहित्य जप्त

वनविभागाने केलेल्या कारवाईत विद्युत प्रवाह सोडण्यासाठी वापरण्यात आलेल्या १४ खुंट्या, अंदाजे दोन किलो जीआय तार, एक पावडा, टू-कोर वायर आणि वाघाचा मृतदेह खेचण्यासाठी वापरण्यात आलेला ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात विद्युत प्रवाहामुळे वन्यजीवाचा मृत्यू झाल्याचा संशय असून, वनविभागाकडून पुढील तपास सुरू आहे.

NTCA च्या नियमांनुसार शवविच्छेदन आणि दहन

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (NTCA) मानक कार्यपद्धतीनुसार मृत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर नियमानुसार वाघाच्या मृतदेहाचे दहन करण्यात आले. यावेळी नागपूरच्या उपवनसंरक्षक डॉ. विनीता व्यास, सहाय्यक वनसंरक्षक गोविंदा लुचे, मानद वन्यजीव रक्षक व NTCA प्रतिनिधी अविनाश लोंढे, मानद वन्यजीव रक्षक अजिंक्य भटकर, पशुवैद्यकीय अधिकारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी आणि सातपुडा फाउंडेशनचे मंदार पिंगळे उपस्थित होते.

वनविभागासह पोलिसांकडूनही तपास

या प्रकरणी अवैध शिकारीच्या अनुषंगाने रामटेक वनपरिक्षेत्र कार्यालयात वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अवैध विद्युत पुरवठ्याच्या प्रकरणी महावितरणकडून रामटेक पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

उपवनसंरक्षक डॉ. विनीता व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक गोविंदा लुचे, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे आणि वनविभागाचे कर्मचारी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button