Buldhanacitynews

दुष्काळातही युवा शेतकऱ्याची जिद्द! बुलढाण्यात फुलली रोझेल शेती; पाण्याअभावी उत्पादन घटण्याची भीती

आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात घेतले जाणारे रोझेल पीक आता बुलढाण्यात; विहिरीचे पाणी आटले, शेजाऱ्याच्या विहिरीच्या आधारावर उमाकांत पवार यांनी जगवली शेती

(सिटी न्यूज प्रतिनिधी – गजानन राऊत, बुलढाणा)

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, शेतकऱ्यांसमोर खरीप हंगामानंतर आता रब्बी पिके जगविण्याचेही मोठे आव्हान उभे राहिले आहे. पाण्याअभावी शेतातील पिके वाळण्याची भीती असताना चिखली तालुक्यातील सवना येथील एका युवा शेतकऱ्याने मात्र वेगळाच प्रयोग केला आहे. उमाकांत पवार या युवा शेतकऱ्याने आपल्या शेतात रोझेल फार्मिंगची लागवड करून प्रतिकूल परिस्थितीतही हे पीक जगविण्याची जिद्द दाखवली आहे.

आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये प्रामुख्याने घेतले जाणारे रोझेल पीक आता बुलढाणा जिल्ह्यातही फुलविण्याचा प्रयत्न उमाकांत पवार यांनी केला आहे. मात्र, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीने त्यांच्या या प्रयोगासमोर मोठे संकट उभे केले आहे.

रोझेल पिकाच्या लागवडीनंतर सुरुवातीला पिकाची वाढ चांगली होण्याची अपेक्षा होती. मात्र, पिकाला ज्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाण्याची गरज होती, त्याच काळात त्यांच्या शेतातील विहिरीचे पाणी आटले. त्यामुळे पिकाची वाढ खुंटू लागली. अशा परिस्थितीत हार न मानता उमाकांत पवार यांनी शेजारील शेतकऱ्यांच्या विहिरीतून पाणी घेऊन आपले पीक जगविण्याचा प्रयत्न केला.

मोठ्या कष्टाने त्यांनी रोझेलची शेती टिकवून ठेवली असली, तरी पाण्याच्या कमतरतेमुळे अपेक्षित वाढ न झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता त्यांना सतावत आहे. यंदा अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळणार नसले, तरी रोझेल शेतीचा हा प्रयोग यशस्वी करून दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

दुष्काळाच्या संकटात पारंपरिक शेतीसोबतच वेगळ्या पिकांचे प्रयोग करण्याची उमाकांत पवार यांची जिद्द इतर शेतकऱ्यांसाठीही उत्सुकतेचा विषय ठरत आहे. मात्र, अशा प्रयोगांना यशस्वी करण्यासाठी पाण्याची उपलब्धता किती महत्त्वाची आहे, हे त्यांच्या शेतीतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

बाईट : उमाकांत पवार – युवा शेतकरी

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button