Accident NewsBuldhanacitynews

समृद्धी महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, ६ प्रवासी जखमी!

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले; भरधाव बस लोखंडी दुभाजकावर आदळून अडकली, मेहकर तालुक्यात मध्यरात्रीची घटना

(सिटी न्यूज प्रतिनिधी – गजानन राऊत, बुलढाणा)

मेहकर, दि. २५ नोव्हेंबर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून, मेहकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात घडला. समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव बस लोखंडी दुभाजकावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य ५ ते ६ प्रवासी जखमी झाले. ही घटना बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास घडली.

गौरव पांडे असे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव असून, शिवानंद हांचिनायटी (वय ३५, रा. नागपूर) असे ट्रॅव्हल्स चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथून प्रवाशांना घेऊन खासगी ट्रॅव्हल्स बस (क्रमांक एमएच ०९ जीजे ७३१५) मुंबईच्या दिशेने जात होती. दरम्यान, मेहकर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडॉरच्या चॅनल क्रमांक २९६.०५ जवळ बस पोहोचली असता चालकाने समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी समोरील वाहनाला धडक बसल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर भरधाव बस महामार्गाच्या बाजूला असलेल्या लोखंडी दुभाजकावर आदळली आणि दोन्ही दुभाजकांच्या मधोमध जाऊन अडकली.

अपघाताची तीव्रता एवढी होती की, बसमधील प्रवासी गौरव पांडे हे बसच्या डाव्या बाजूने बाहेर फेकले गेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील अन्य ५ ते ६ प्रवाशांना गंभीर तसेच किरकोळ दुखापती झाल्या.

अपघाताची माहिती छत्रपती संभाजीनगर येथील नियंत्रण कक्षातून (CRO) मिळताच वाकी समृद्धी महामार्ग उपकेंद्राचे ए. एस. मंगेश खडसे, हवालदार आराख, पोलीस कर्मचारी आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या (MSF) जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाने जखमी प्रवाशांना उपचारासाठी हलविले. तसेच अपघातस्थळी बॅरिकेडिंग करून महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.

या अपघाताप्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात पुढील कार्यवाही सुरू असून, अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास केला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button