AMCActionAmravaticitynews

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय आयोगाचा महापालिकेत आढावा; सहा वारसांना अनुकंपा नियुक्तीचे आदेश

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य रवि कुमार कलोसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; वेतन, आरोग्य, सामाजिक सुरक्षा, निवास व पुनर्वसनाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा

अमरावती, दि. २५ नोव्हेंबर : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, सेवा-सुविधा आणि त्यांच्या सामाजिक व आर्थिक पुनर्वसनाच्या मुद्द्यांवर राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग, नवी दिल्लीचे सदस्य तथा भारत सरकारचे सचिव दर्जा प्राप्त रवि कुमार कलोसे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी अमरावती महानगरपालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांचे किमान वेतन, आरोग्य सुविधा, सामाजिक सुरक्षा, निवास व्यवस्था, पदोन्नती, वारसा हक्क नियुक्ती आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेष म्हणजे, लाड व पागे समितीच्या शिफारशीनुसार सहा सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीचे आदेश प्रदान करण्यात आले.

बैठकीच्या प्रारंभी महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी आयोगाचे सदस्य रवि कुमार कलोसे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. स्थायी, अस्थायी आणि कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची संख्या, त्यांच्या सेवाशर्ती, उपलब्ध सुविधा तसेच प्रलंबित मागण्यांची माहिती यावेळी घेण्यात आली.

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि सामाजिक सुरक्षेवर लक्ष

महानगरपालिकेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळते का, तसेच असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा कायदा २००८ अंतर्गत त्यांना मिळणाऱ्या लाभांची अंमलबजावणी होते का, याबाबत चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (PF), ईएसआयसी, आरोग्य सुविधा आणि इतर सामाजिक सुरक्षा लाभ मिळण्याच्या स्थितीचाही आढावा घेण्यात आला.

याशिवाय अस्वच्छ शौचालयांची सद्यस्थिती, सामुदायिक प्रसाधनगृहांची संख्या व देखभाल, हाताने मैला साफ करणाऱ्या कामगारांचे सर्वेक्षण आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यात आली. प्रतिबंधित हाताने मैला साफसफाईविषयक कायद्याबाबत जनजागृती, कामगारांचे प्रशिक्षण आणि सुरक्षिततेसाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमांचाही आढावा घेण्यात आला.

मॅनहोल स्वच्छतेसाठी यंत्रणा आणि NAMASTE योजनेचा आढावा

गटार व मॅनहोल साफसफाईदरम्यान कामगारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा बैठकीत महत्त्वाचा ठरला. मॅनहोल क्लीनिंग मशीनसंदर्भातील राज्यस्तरीय योजनेची सद्यस्थिती, आपत्कालीन प्रतिसाद स्वच्छता युनिट (ERSU) स्थापन करण्याची कार्यवाही तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांसाठी महापालिका स्तरावर समन्वय समितीच्या स्थापनेबाबत चर्चा झाली.

केंद्र सरकारच्या NAMASTE योजनेंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण व प्रोफाइलिंग, आरोग्य तपासणी, सामाजिक सुरक्षा, प्रशिक्षण आणि सुरक्षा साधनांचे वितरण याबाबतही माहिती घेण्यात आली. या योजनेसाठी प्राप्त निधी आणि त्याच्या विनियोगाचाही आढावा घेण्यात आला.

लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सहा वारसांना नियुक्ती

बैठकीतील महत्त्वपूर्ण बाब म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी देण्याच्या प्रलंबित प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. लाड व पागे समितीच्या शिफारशींनुसार सहा वारसांना नियुक्ती आदेश देण्यात आले. आयोगाचे सदस्य रवि कुमार कलोसे यांच्या हस्ते रजनी राम पछेल, कौतिक मुकेश चावरे, योगेश मधु चावरे, सागर सारसर, अतुल धवसेल आणि प्रीती खरारे यांना नियुक्ती आदेशपत्र प्रदान करण्यात आले.

याशिवाय महानगरपालिकेच्या कायम आस्थापनेवरील अतिरिक्त सफाई कर्मचाऱ्यांची संख्या, स्थायी पदांवर वर्ग करण्यात आलेले कर्मचारी, लाड व पागे समितीच्या शिफारशीनुसार प्रलंबित असलेली प्रकरणे आणि कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार वर्ग-३ व वर्ग-४ मधील पदोन्नतीची सद्यस्थिती तपासण्यात आली.

३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांच्या घरांच्या मालकीचा मुद्दा

सफाई कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्नही बैठकीत उपस्थित झाला. महापालिकेमार्फत बांधण्यात आलेली निवासस्थाने व सदनिकांची सद्यस्थिती, मागील ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरांचा मालकी हक्क देण्याबाबत सुरू असलेली प्रक्रिया यावर चर्चा झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांची तसेच प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पांची माहिती घेण्यात आली.

पुनर्वसन योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या दुकानगाळे व व्यापारी संकुलांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या आश्रितांसाठी राखीव असलेल्या गाळ्यांची सद्यस्थिती, त्यांचे वाटप आणि संबंधित कार्यवाहीचाही आढावा घेण्यात आला.

सेवानिवृत्तीचे लाभ, सेवा पुस्तके आणि पदोन्नतीवर चर्चा

सफाई कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्या, सेवा पुस्तिकांची अद्ययावत स्थिती, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देय असलेले आर्थिक लाभ आणि सुधारित आश्वासित प्रगती योजना (१०:२०:३०) अंतर्गत मिळणाऱ्या लाभांची माहिती घेण्यात आली. तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ आणि संबंधित नियमांनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अस्तित्वात असलेल्या उपविधी व नियमांचाही आढावा घेण्यात आला.

गटार सफाई व स्वच्छतेसाठी नियुक्त एजन्सींचे करारनामे, निविदांमधील अटी व शर्ती आणि मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग रुल्स २०१३ च्या अंमलबजावणीबाबतही चर्चा करण्यात आली.

सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा, निवास, पुनर्वसन आणि आर्थिक स्थैर्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. त्यांच्या प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य देऊन शासकीय योजनांचा लाभ पात्र कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांकडून माहिती घेण्यात आली.

या बैठकीला महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, मुख्य लेखाधिकारी शिल्पा पवार, शहर अभियंता श्रीधर कांबळे, सहाय्यक नगररचनाकार कांचन भावे, सहाय्यक आयुक्त श्रीकांतसिंह चौव्हाण, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटबागे, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, कार्यालय अधीक्षक गुलशन मिरानी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कामगार उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button