Accident NewsAmaravti GraminAmravaticitynews

घरात साठवलेल्या कापसाच्या गंजीला भीषण आग; अल्पभूधारक शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान!

८० क्विंटलपैकी ५० ते ६० क्विंटल कापूस जळून खाक झाल्याचा अंदाज; वर्षभराच्या कष्टांची राख, आर्थिक मदतीसाठी शेतकऱ्याची आर्त हाक

बडनेरा : मच्छिंद्र भटकर

आधीच दुष्काळ, शेतीचा वाढता खर्च आणि नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता नव्या संकटांची भर पडत आहे. बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भातकुली तालुक्यातील हातुर्णा पुनर्वसन गाव पांढरी येथे एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या घरात साठवून ठेवलेल्या कापसाच्या गंजीला अचानक भीषण आग लागली. या आगीत महादेवराव रताळे यांच्या घरात साठवलेल्या अंदाजे ८० क्विंटल कापसापैकी ५० ते ६० क्विंटल कापूस जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्घटनेत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आगीची घटना लक्षात येताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत मोठ्या प्रमाणात कापूस जळून खाक झाला होता. वर्षभर शेतात राबून पिकविलेला कापूस डोळ्यांसमोर जळताना पाहण्याची वेळ महादेवराव रताळे यांच्यावर आली. या घटनेमुळे शेतकरी कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.

आगीच्या घटनेत पोलीस पाटलांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

या दुर्घटनेनंतर आगीच्या नुकसानीसोबतच संकटाच्या वेळी मदतीसाठी प्रशासनाला माहिती देण्याच्या मुद्द्यावरूनही चर्चा सुरू झाली आहे. संबंधित शेतकऱ्याच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस पाटील घाटे यांच्याशी संपर्क साधून पोलीस स्टेशनला फोन करण्याची विनंती केली होती. मात्र, ‘हे काम माझे नाही,’ असे उत्तर मिळाल्याचा आरोप शेतकरी कुटुंबाकडून करण्यात आला आहे. त्यानंतर पोलीस पाटील घटनास्थळी येऊन पाहणी करून गेल्याचे शेतकऱ्याच्या मुलाने सांगितले.

घरात आग लागून लाखोंचे नुकसान होत असताना संबंधित यंत्रणांना तातडीने माहिती देण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? आपत्कालीन परिस्थितीत गावपातळीवर मदतीसाठी समन्वय साधण्याची भूमिका कोण बजावणार? असे प्रश्न या घटनेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. या प्रकरणात पोलीस पाटील यांची बाजूही समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रशासनाच्या मदतीकडे शेतकरी कुटुंबाचे लक्ष

आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या महादेवराव रताळे यांच्यासमोर आता उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरात साठवलेला कापूस हेच त्यांच्या वर्षभराच्या मेहनतीचे आणि अपेक्षित उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. मात्र, आगीच्या एका घटनेने त्यांच्या आर्थिक नियोजनाला मोठा फटका बसला आहे.

संबंधित महसूल विभाग आणि कृषी विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा करावा, जळालेल्या कापसाचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे आणि शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी अपेक्षा बाधित शेतकरी कुटुंबाकडून व्यक्त होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button