मोदींच्या मनमानीने देश चालणार नाही, भारत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनीच चालणार – अभिजित दिपके

नागपुरात उद्या ‘संविधान वाचवा’ रॅली; अभिनेता प्रकाश राज यांच्यासह विविध मान्यवरांचा सहभाग – निवडणूक प्रक्रियेवरही भाजपला लक्ष्य करत दिपकेंचा घणाघात
नागपूर : देशातील निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आणि संविधानाच्या रक्षणाचा मुद्दा पुढे करत उद्या नागपुरात ‘संविधान वाचवा’ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये अभिनेते प्रकाश राज यांच्यासह रांका आणि इतर मान्यवर सहभागी होणार असल्याची माहिती अभिजित दिपके यांनी दिली. यावेळी त्यांनी देशातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करत भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला.

दिपके म्हणाले की, देशातील विविध राज्यांमध्ये मतांची चोरी होत असल्याचा आरोप सातत्याने समोर येत आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा संदर्भ देत त्यांनी भाजपवर टीका केली. दूध डेअरीसारख्या संस्थेची निवडणूक जिंकण्यासाठीही गैरप्रकार केले जात असतील, तर इतर महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये काय घडत असेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
नाशिकमधील कथित निवडणूकविषयक प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजपमध्ये कोण निवडणूक लढवणार आणि कोण जिंकणार, हे जर पक्षाचे मुख्यालयच ठरवणार असेल, तर निवडणुका घेण्याची गरज तरी काय, असा सवाल त्यांनी केला.
भाजप मुख्यालयातूनच सर्व निर्णय घेतले जातात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यापर्यंत व्हॉट्सॲपवरून यादी पाठवली जाते. त्यानंतर ते कठपुतळीप्रमाणे ती यादी वाचून दाखवतात, असा गंभीर आरोप दिपके यांनी केला. देश चालवायचा असेल, तर जनतेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना दिपके म्हणाले की, मोदींच्या मनमानीने देश चालणार नाही. हा देश कोणत्याही एका व्यक्तीच्या इच्छेने नव्हे, तर भारतीय राज्यघटनेच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या आधारावर चालला पाहिजे. सत्तेवर कोणीही आले, कोणाचेही सरकार स्थापन झाले, तरी देशाचा कारभार संविधानाच्या चौकटीत आणि बाबासाहेबांच्या विचारांनुसारच चालला पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, उद्या नागपुरात होणाऱ्या ‘संविधान वाचवा’ रॅलीच्या माध्यमातून संविधानाचे संरक्षण, लोकशाही मूल्यांचे जतन आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. या रॅलीतून केंद्र सरकार आणि निवडणूक यंत्रणेला कोणते प्रश्न विचारले जातात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



