citynewsCrime NewsWashim

कामरगावात अवैध धंद्यांचे साम्राज्य! पोलीस चौकीपासून १०० मीटरवर दारू-मटका सुरू असल्याचा आरोप

जयस्तंभ चौकात अवैध दारूची चार दुकाने, वरली मटका आणि गांजा विक्रीच्या तक्रारी; महिला व शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, नागरिकांचे SDPO यांना निवेदन

कामरगाव प्रतिनिधी :

वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील मोठी बाजारपेठ आणि अप्पर तहसीलचा दर्जा प्राप्त असलेल्या कामरगाव शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरातील मुख्य वर्दळीचा परिसर असलेल्या जयस्तंभ चौकात अवैध दारूची चार दुकाने आणि वरली मटक्याचे व्यवहार खुलेआम सुरू असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. याशिवाय गांजा आणि प्रतिबंधित गुटख्याची विक्रीही सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकारांमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महिला आणि शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

जयस्तंभ चौक हा कामरगाव शहरात प्रवेश करण्याचा प्रमुख मार्ग असून, याच परिसरात शाळा, बँका आणि विविध व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. या भागात कथित अवैध दारू विक्री आणि मटक्याचे व्यवहार सुरू असल्याने मद्यपी तसेच असामाजिक प्रवृत्तीच्या लोकांचा वावर वाढल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. परिणामी, या मार्गावरून ये-जा करणाऱ्या महिला, शाळकरी मुली आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महिला सुरक्षेसाठी पोलिसांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

पोलीस चौकीपासून अवघ्या १०० मीटरवर अवैध धंदे?

या प्रकरणातील सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे, धनज पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या कामरगाव पोलीस चौकीपासून अवघ्या १०० मीटर अंतरावरच हे कथित अवैध दारू आणि मटक्याचे धंदे सुरू असल्याचा आरोप आहे. पोलीस चौकीच्या इतक्या जवळ हे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी असूनही प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

‘पोलिसांना दोन नंबरी धंदे करणारे लोक आवडतात का?’ अशी उपरोधिक चर्चा सध्या गावात दबक्या आवाजात सुरू असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. या आरोपांमुळे स्थानिक पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नागरिकांचे SDPO कार्यालयाला निवेदन

कामरगावमधील अवैध धंद्यांमुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित करत गावातील नागरिकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. जयस्तंभ चौकासह शहरातील सर्व अवैध धंदे तातडीने बंद करावेत, संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

या निवेदनाच्या प्रती वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, अमरावती पोलीस आयुक्तालय आणि महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांनाही ई-मेलद्वारे पाठविण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button