citynewsFarmersCrisisKolhapurMaharashtraSangli

शक्तीपीठ महामार्गावरून शेतकरी आक्रमक; मोजणीचे साहित्य पेटवले, “एक इंचही जमीन देणार नाही!”

कोल्हापूर-सांगलीत जमीन मोजणीला तीव्र विरोध; पहाटे ५ वाजता पोलीस बंदोबस्तात आलेल्या पथकाला शेतकऱ्यांनी रोखले, राजू शेट्टींचा सरकारला इशारा

कोल्हापूर / सांगली : शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन अधिग्रहणावरून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा संताप पुन्हा एकदा रस्त्यावर आला आहे. महामार्गासाठी जमीन मोजणी करण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून, काही ठिकाणी मोजणीसाठी आलेल्या पथकांना माघारी जाण्यास भाग पाडले. कोल्हापूर जिल्ह्यातील कोनवडे गावात पहाटे पाच वाजता पोलीस बंदोबस्तात दाखल झालेल्या मोजणी पथकाला शेतकऱ्यांनी रोखले. यावेळी मोजणीसाठी वापरण्यात येणारे ट्रायपॉड स्टँड हिसकावून घेत ते पेटवून देण्यात आले. तर सांगली जिल्ह्यातील माहुली येथेही शेतकऱ्यांनी प्रशासनाला विरोध केला. या घटनांमुळे शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

भुदरगडमध्ये प्रांत कार्यालयावर मोर्चा

गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, भुदरगड आणि चंदगड तालुक्यांमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी गारगोटी येथील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदवला. महामार्गासाठी सुपीक शेती संपादित करण्यास शेतकऱ्यांचा विरोध असून, कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

कोनवडेत पहाटे पाच वाजता तणाव; मोजणीचे साहित्य पेटवले

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या तालुक्यातील कोनवडे गावात पहाटे पाचच्या सुमारास तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. पोलीस बंदोबस्तात जमीन मोजणीसाठी आलेल्या पथकाला शेतकऱ्यांनी एकत्र येत रोखले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी मोजणीसाठी वापरण्यात येणारे ट्रायपॉड स्टँड हिसकावून घेतले आणि भररस्त्यात पेटवून दिले. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

माहुलीत शेतकऱ्यांचा आक्रोश; अधिकाऱ्यांच्या पाया पडून मांडली व्यथा

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील माहुली गावातही जमीन मोजणीसाठी आलेल्या प्रशासन आणि पोलीस पथकाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. कर्ज काढून जमिनी विकसित केल्या, वर्षानुवर्षांच्या मेहनतीतून शेती उभी केली आणि आता महामार्गाच्या नावाखाली ती जमीन गमावण्याची वेळ येत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

यावेळी एका वयोवृद्ध शेतकऱ्याने अधिकाऱ्यांच्या पाया पडून आपली व्यथा मांडली. दडपशाही न करता शेतकऱ्यांची भूमिका वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवावी, अशी विनंती त्यांनी केली. स्वतःच्या जमिनीचे रक्षण करण्यासाठी विरोध करणे हा गुन्हा आहे का, असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

राजू शेट्टींचा सरकारला इशारा; एक इंचही जमीन देणार नसल्याचा निर्धार

या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही आक्रमक भूमिका घेत सरकारला इशारा दिला आहे. सरकारने कितीही दबाव आणला, तरी शक्तीपीठ महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. जमिनीसाठी रक्ताचे पाट वाहतील, पण जमीन सोडणार नाही, अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.

प्रशासनासमोर मोजणीचे मोठे आव्हान

दरम्यान, जमीन मोजणीची माहिती मिळताच अनेक गावांमध्ये शेतकरी पहाटेपासूनच एकत्र येऊन प्रशासनाच्या पथकांना विरोध करत आहेत. काही ठिकाणी शेतकरी, पोलीस आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद तसेच धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध शांत करून जमीन मोजणीची प्रक्रिया पुढे नेण्याचे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.

एकीकडे सरकारचा शक्तीपीठ महामार्गाचा प्रकल्प आणि दुसरीकडे जमिनीच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेतलेले शेतकरी, यामुळे संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. आता सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काय भूमिका घेते आणि जमीन मोजणीबाबत कोणता निर्णय घेते, याकडे कोल्हापूर आणि सांगलीसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button