आईच्या निधनानंतर अवघ्या १५ दिवसांत सहा वर्षीय चिमुरड्याचाही दुर्दैवी मृत्यू; हॉस्टेलला जाण्याच्या आदल्याच दिवशी काळाचा घाला!

नायगाव पूर्वेतील नवकार टॉवर सोसायटीत अकराव्या मजल्यावरून पडून बालकाचा मृत्यू; महाबळेश्वरला जाण्यासाठी बॅगही होती तयार
वसई : नियतीचा क्रूर खेळ म्हणावा की काळाचा निर्दयी घाला! अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी आईचे छत्र हरपलेल्या सहा वर्षांच्या चिमुरड्यावर काळाने पुन्हा घाला घातला. आईच्या मायेविना पोरका झालेला मिलीत दिनेशकुमार सुतार हा बुधवारी नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी महाबळेश्वर येथील हॉस्टेलमध्ये जाणार होता. त्यासाठी त्याची बॅगही भरून तयार ठेवण्यात आली होती. मात्र, हॉस्टेलला रवाना होण्याच्या आदल्याच दिवशी घडलेल्या दुर्दैवी घटनेत त्याचा मृत्यू झाला.
नायगाव पूर्वेकडील नवकार टॉवर सोसायटीमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली. सोसायटीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने सहा वर्षीय मिलीत दिनेशकुमार सुतार याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सुतार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी आईचे निधन झाल्याने मिलीत आधीच आईच्या मायेपासून वंचित झाला होता. त्याच्या पुढील संगोपनासाठी आणि शिक्षणासाठी त्याला महाबळेश्वर येथील हॉस्टेलमध्ये पाठवण्याची तयारी करण्यात आली होती. बुधवारी तो हॉस्टेलमध्ये जाणार होता. मात्र, त्यापूर्वीच काळाने त्याला हिरावून नेले. ज्या वयात मुलांनी खेळण्या-बागडण्याचे आणि आई-वडिलांच्या मायेचा आधार घेण्याचे दिवस असतात, त्याच वयात या चिमुरड्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.



