citynewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

बहिणीच्या हळदी समारंभात छेडछाडीचा वाद; भावावर चाकूसारख्या धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला!

नागपुरात लग्नघरातच रक्तरंजित थरार; पोटावर दोन वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न, जखमी तरुण ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल; हुडकेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल

नागपूर | प्रतिनिधी

लग्नघरात आनंदाचे वातावरण असताना बहिणीच्या हळदी समारंभात झालेल्या छेडछाडीच्या प्रकाराने अचानक हिंसक वळण घेतले. वादातून एका २० वर्षीय तरुणावर चाकूसारख्या धारदार शस्त्राने पोटावर दोन वेळा वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी ट्रॉमा सेंटर मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी तरुणाचे नाव पियुष अमित गुप्ता (वय २० वर्षे) असे आहे. त्याची बहीण जिया गुप्ता हिचे लग्न २४ नोव्हेंबर २०२६ रोजी असल्याने घरात हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमादरम्यान काही तरुणांकडून तक्रारदाराच्या बहिणीची छेडछाड करण्यात आल्याचा आरोप आहे.

तक्रारीतील माहितीनुसार, आरोपींचे साथीदार सचित निधोरे आणि वेदांत बरडे यांनी जिया गुप्ता हिची छेडछाड केल्याने उपस्थितांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद वाढत असताना जखमी तरुण आणि त्याचा मित्र घटनास्थळी गेले. मात्र, परिस्थिती शांत होण्याऐवजी वाद अधिकच चिघळला.

याचवेळी आरोपीने शिवीगाळ करीत चाकूसारख्या धारदार शस्त्राने पियुषच्या पोटावर दोन वेळा वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी ट्रॉमा सेंटर मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

घटनेनंतर जखमीच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नागपूर शहर पोलीस करीत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button