citynewsCrime NewsMaharashtraPune

पुण्यात शिवाजीनगर कोर्टाबाहेर भरदिवसा गोळीबार; साक्षीदाराची हत्या, सहा जणांचा कोयत्याने हल्ला

गोळीबारात नेम चुकल्यानंतर कोयत्याने वार; आरोपी दोन पिस्तूल फेकून फरार, पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांकांवरही प्रतिसाद नसल्याचा प्रत्यक्षदर्शीचा दावा

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर गेट क्रमांक ४ जवळ भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून, मृत व्यक्ती एका हत्या प्रकरणातील साक्षीदार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सहा जणांनी संबंधित व्यक्तीवर हल्ला केला. हल्लेखोरांनी गोळीबार केला; मात्र नेम चुकल्यानंतर संबंधित व्यक्तीवर कोयत्याने वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने दोन पिस्तूल घटनास्थळी फेकून पळ काढल्याची माहिती आहे. घटनास्थळावरून एक बंदूक आणि दोन मॅगझिनही आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेतील प्रत्यक्षदर्शीने महत्त्वाची माहिती दिली आहे. घटनेनंतर मदतीसाठी १०८ आणि ११२ या आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र दोन्ही क्रमांकांवर फोन लागला नसल्याचा दावा प्रत्यक्षदर्शीने केला आहे. त्यामुळे न्यायालयासारख्या संवेदनशील परिसरात घडलेल्या या घटनेसोबतच आपत्कालीन यंत्रणेच्या प्रतिसादाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

न्यायालय परिसरातच भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून, हल्ल्यामागील नेमके कारण, आरोपींची ओळख आणि या हत्येचा पूर्वनियोजित कट होता का, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button