राजकीय टीका करणाऱ्या आवाजांना दाबण्याचा प्रयत्न? मेटाविरोधात युवक काँग्रेस आक्रमक!

सोशल मीडिया खात्यांवरील कथित निर्बंधांबाबत पारदर्शकतेची मागणी; मेटाला सात दिवसांचा अल्टिमेटम, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची पत्रकार परिषद
महाराष्ट्र : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्या पोस्ट आणि राजकीय अभिव्यक्तीवर कथितरीत्या निर्बंध लादले जात असल्याचा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने मेटा कंपनीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारी आदेशांच्या आधारे भारतीय सोशल मीडिया खाती ब्लॉक करणे किंवा त्यांच्यावरील मजकूर रोखून धरण्याच्या कथित प्रकारांबाबत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी युवक काँग्रेसने केली आहे. या गंभीर मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे.

हैदराबाद, गुरुग्राम आणि मुंबई येथील मेटाच्या कार्यालयांबाहेर आंदोलन केल्यानंतर भारतीय युवक काँग्रेसने मेटा कंपनीला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या मुदतीत कंपनीने सोशल मीडिया खात्यांवरील निर्बंध, सरकारी आदेश आणि कंटेंट मॉडरेशन प्रक्रियेबाबत स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आजच्या काळात सोशल मीडिया हे लोकशाही संवादाचे महत्त्वाचे माध्यम बनले आहे. नागरिक, पत्रकार, स्वतंत्र कंटेंट क्रिएटर्स आणि राजकीय संघटना या माध्यमातून आपली मते मांडतात, सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करतात आणि जनतेचे प्रश्न सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवतात. मात्र, राजकीय टीका करणाऱ्या आवाजांवर निवडकपणे निर्बंध लादले जात असतील, तर हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही व्यवस्थेसमोरील गंभीर प्रश्न असल्याचे युवक काँग्रेसने म्हटले आहे.
युवक काँग्रेसने मेटाकडे चार प्रमुख मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागितले आहे. गेल्या सहा महिन्यांत सरकारी आदेशांनुसार किती भारतीय सोशल मीडिया खाती ब्लॉक करण्यात आली किंवा त्यांच्यावर निर्बंध लादण्यात आले, याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच राहुल गांधी यांचा उल्लेख करणाऱ्या किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करणाऱ्या पोस्टवर स्वयंचलित पद्धतीने निर्बंध का लादले जात आहेत, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
मेटाच्या कंटेंट मॉडरेशन प्रणालीमध्ये राजकीय मजकुराबाबत भेदभाव केला जात आहे का, तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांशी संबंधित पोस्टवर निवडक कारवाई होते का, याबाबत कंपनीने पारदर्शक स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे. यासोबतच विरोधी पक्षांचे नेते, पत्रकार, स्वतंत्र कंटेंट क्रिएटर्स आणि सामान्य नागरिक यांच्या अभिव्यक्तीवर लादण्यात आलेले कथित बेकायदेशीर निर्बंध मागे घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.
मेटाने कोणत्याही राजकीय दबावाऐवजी भारतीय संविधानातील भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूल्यांचा आदर केला पाहिजे, अशी भूमिका युवक काँग्रेसने मांडली आहे. सोशल मीडिया कंपन्यांच्या कंटेंट मॉडरेशन प्रक्रियेत पारदर्शकता असणे आवश्यक असून, राजकीय विचारधारा किंवा सत्ताधाऱ्यांच्या सोयीच्या आधारावर कोणत्याही नागरिकाचा आवाज दाबला जाऊ नये, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या सर्व मागण्यांवर उत्तर देण्यासाठी भारतीय युवक काँग्रेसने मेटाला सात दिवसांची मुदत दिली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसनेही या भूमिकेला पाठिंबा देत सोशल मीडियावरील अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पारदर्शकता आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
सरकारवर टीका करणे हा गुन्हा नाही, मतभेद व्यक्त करणे हा देशद्रोह नाही आणि सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे हा प्रत्येक नागरिकाचा लोकशाही अधिकार आहे. मग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हा आवाज दाबण्याचा प्रयत्न का होत आहे? असा थेट सवाल युवक काँग्रेसने उपस्थित केला आहे.
आता मेटा कंपनी या आरोपांवर काय भूमिका घेते आणि सात दिवसांच्या अल्टिमेटमनंतर कोणते स्पष्टीकरण देते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



