citynewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

पैशांची मागणी पूर्ण न केल्याने तरुणाच्या पोटात चाकू खुपसला; नागपुरात तिघांचा जीवघेणा हल्ला!

हजारीपहाड परिसरातील शिवमंदिराजवळ थरार; २४ वर्षीय तरुण गंभीर जखमी, मेयो रुग्णालयात उपचार सुरू; तिन्ही आरोपी पोलिसांच्या अटकेत

नागपूर, प्रतिनिधी : पैशांची मागणी पूर्ण न केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तिघांनी मिळून एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हजारीपहाड वस्ती परिसरात ही घटना घडली. आरोपींनी आधी तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर एकाने त्याच्या पोटावर चाकूने वार केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष सुनील सोमकुंवर (वय २४) असे जखमी तरुणाचे नाव आहे. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजताच्या दरम्यान हजारीपहाड वस्तीतील शिवमंदिराजवळील सार्वजनिक शौचालय परिसरात ही घटना घडली. यावेळी आरोपींनी आशिष याच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्याच्याशी वाद घालत संगनमताने मारहाण करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, आरोपी क्रमांक एक सागर ज्ञानेश्वर धुर्वे याने आपल्याजवळील चाकू काढून आशिषच्या पोटावर वार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात आशिष गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाला. घटनेनंतर त्याला तातडीने उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

या घटनेप्रकरणी जखमी आशिषची आई उज्वला सुनील सोमकुंवर यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सागर ज्ञानेश्वर धुर्वे, करण अनिल नायडू आणि श्याम अनिल नायडू या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला. तिन्ही आरोपी हजारीपहाड परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (१) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. पैशांच्या मागणीवरून सुरू झालेला वाद थेट चाकूहल्ल्यापर्यंत पोहोचल्याने हजारीपहाड परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास गिट्टीखदान पोलीस करीत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button