दीक्षाभूमीप्रमाणे ड्रॅगन पॅलेसनेही नागपूरला जागतिक नकाशावर आणले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ड्रॅगन पॅलेसच्या विकासासाठी सरकारचा पुढाकार; नियोजन तुमचे, निधी महाराष्ट्र सरकारचा! मेट्रो स्थानकालाही ड्रॅगन पॅलेसचे नाव देणार
नागपूर : भगवान गौतम बुद्धांनी जगाला प्रज्ञा, करुणा आणि शीलाचा संदेश दिला. तलवारीच्या बळावर नव्हे, तर प्रज्ञा, शील आणि करुणेच्या सामर्थ्यावर त्यांनी संपूर्ण जगाला विचारांची दिशा दिली. भगवान बुद्धांचा धम्म हा मानवतेला मार्गदर्शन करणारा विचार असून, त्यांच्या शिकवणीला आजही जगभरात मोठे महत्त्व आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कार्तिक पौर्णिमेच्या पवित्र पर्वावर आयोजित वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते.

भगवान गौतम बुद्धांच्या जीवनात पौर्णिमेला विशेष महत्त्व असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, भगवान बुद्धांचा जन्म, त्यांना बोधिसत्त्वत्व प्राप्त होण्याचा दिवस आणि महापरिनिर्वाणाचे स्मरण या सर्व घटनांचा पौर्णिमेशी विशेष संबंध आहे. त्यामुळे पौर्णिमेचा दिवस बौद्ध परंपरेत अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. भगवान बुद्धांनी दिलेल्या धम्मातून प्रज्ञा, करुणा आणि शील ही मूल्ये मानवजातीला मिळाली आहेत.

जपानमध्येही मोठ्या संख्येने बौद्ध उपासक आणि उपासिका बौद्ध धर्माचे जतन आणि संवर्धन करीत आहेत. भारत आणि जपान यांच्यातील अडीच हजार वर्षांची मैत्रीपूर्ण परंपरा आजही कायम असून, सुलेखाताई कुंभारे आणि मॅडम मोगावा यांनी ही मैत्री अधिक दृढ करण्याचे काम केले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
नागपूरच्या जागतिक ओळखीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, पवित्र दीक्षाभूमीने नागपूरला जगाच्या नकाशावर आणले, त्याचप्रमाणे ड्रॅगन पॅलेसनेही नागपूरची जागतिक स्तरावर ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे ड्रॅगन पॅलेस हे केवळ धार्मिक स्थळ नसून भारत-जपान मैत्रीचे आणि बौद्ध विचारांच्या जागतिक प्रसाराचे महत्त्वपूर्ण केंद्र आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानी भाषेतूनही उपस्थितांशी संवाद साधला. मॅडम मोगावा यांचे मनःपूर्वक आभार मानत ड्रॅगन पॅलेसमध्ये त्यांचे स्वागत केले. त्यांचे सहकार्य आणि आशीर्वाद यापुढेही असेच मिळत राहावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ड्रॅगन पॅलेसच्या भविष्यातील विकासाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा करताना मुख्यमंत्री म्हणाले की, या परिसराच्या विकासाचे संपूर्ण नियोजन तुम्ही करा, त्यासाठी लागणारा निधी महाराष्ट्र सरकार उपलब्ध करून देईल. यापूर्वी ड्रॅगन पॅलेसपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता रस्त्यांची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे येथे येणे अधिक सोयीचे झाले आहे. याशिवाय मेट्रो स्थानकालाही ड्रॅगन पॅलेसचे नाव देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जपान दौऱ्याचा अनुभव सांगताना मुख्यमंत्र्यांनी कोयासान विद्यापीठाचा उल्लेख केला. हे विद्यापीठ गेल्या १२०० वर्षांपासून बौद्ध अध्ययन आणि संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. या विद्यापीठाला भेट देण्याची संधी मिळाली आणि तेथून विशेष पदवी प्रदान करण्यात आलेली पहिली व्यक्ती असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांचे आशीर्वाद लाभल्यामुळेच जगातील सर्वोत्तम विद्यापीठांपैकी एका विद्यापीठाकडून हा सन्मान मिळाल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.
कार्तिक पौर्णिमेच्या पवित्र दिवशी पार पडलेल्या या वर्धापन दिन सोहळ्यातून भारत-जपान मैत्री, बौद्ध संस्कृतीचे संवर्धन आणि ड्रॅगन पॅलेसच्या आगामी विकासाला नवी दिशा देण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ड्रॅगन पॅलेसच्या विकासासाठी राज्य सरकार निधी उपलब्ध करून देणार असल्याच्या घोषणेमुळे या परिसराच्या विकासाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.



