पोक्सो व बलात्काराच्या गुन्ह्यातील पती-पत्नी अटकेत!

साईनगर-अकोली परिसरातून फ्रेजरपुरा पोलिसांची कारवाई; डॉ. वैशाली भोजने आणि प्रफुल्ल भोजने यांना घेतले ताब्यात
अमरावती : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात पाहिजे असलेल्या पती-पत्नी आरोपींना फ्रेजरपुरा पोलिसांनी अटक केली आहे. अमरावती शहरातील साईनगर-अकोली परिसरात हे दोन्ही आरोपी असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवत दोघांनाही ताब्यात घेतले. या कारवाईमुळे संबंधित प्रकरणाच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.

फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात अप. क्र. 928/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम 64(2)(1), 143(3), 143(4), 351(2), 3(5) तसेच पोक्सो कायद्यातील कलम 4, 6 आणि 21 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात डॉ. वैशाली प्रफुल्ल भोजने (वय 49) आणि प्रफुल्ल वसंतराव भोजने (वय 56) हे पती-पत्नी आरोपी पाहिजे होते.
दरम्यान, दोन्ही आरोपी साईनगर-अकोली परिसरात दिसून आल्याची गोपनीय माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र राजुलवार यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक मिलिंद हिवरे यांनी डीबी पथक आणि महिला पोलीस अंमलदारांच्या मदतीने संबंधित परिसरात शोधमोहीम राबवली. पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता संशयित आरोपी आढळून आले. त्यांची ओळख आणि गुन्ह्यातील सहभागाबाबत खातरजमा केल्यानंतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.

त्यानंतर आरोपींना फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात आणून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत रीतसर अटक करण्यात आली. अटकेतील दोन्ही आरोपी राजापेठ येथील ब्युटी प्लॉट परिसरातील रहिवासी असून त्यांचे मूळ गाव हिवरखेड, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अटकेनंतर दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी न्यायालयात हजर करण्यात येत आहे. या गंभीर प्रकरणात नेमकी कोणती भूमिका होती, तसेच गुन्ह्याशी संबंधित अन्य बाबींचा तपास पोलीस करत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला आणि पोलीस उपायुक्त तथा मुख्यालय प्रभारी परिमंडळ-1 प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र राजुलवार, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद हिवरे यांच्यासह पोलीस हवालदार पाटील, शेखुवाले, पोलीस नाईक बोरकर, सागर, पोलीस शिपाई जावेद, प्रशांत, जयेश, अखिल, पराळे, महिला पोलीस नाईक सपना आणि शासकीय वाहनचालक होमगार्ड अमन यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
या प्रकरणाचा पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस करीत आहेत.



