दुष्काळाच्या सावटातही बडनेऱ्यात दीपोत्सवाचा झगमगाट! विद्युत रोषणाईने ‘मिनी मरिन ड्राईव्ह’चा नजारा

जयहिंद चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत केशरी विद्युत रोषणाईने उजळला परिसर; रंगीबेरंगी आतषबाजीने आसमंत प्रकाशमय, बडनेरा पोलीस ठाण्याची आकर्षक सजावटही ठरली चर्चेचा विषय
बडनेरा : परिसरावर दुष्काळाचे सावट असतानाही सण-उत्सवांचा उत्साह आणि पारंपरिक जल्लोष कायम असल्याचे चित्र बडनेऱ्यात पाहायला मिळाले. दीपावलीनिमित्त संपूर्ण बडनेरा शहर विद्युत रोषणाई, आकर्षक सजावट आणि रंगीबेरंगी आतषबाजीने उजळून निघाले. आनंद, उत्साह आणि एकोप्याच्या वातावरणात बडनेरावासीयांनी दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.

बडनेरा नवी वस्ती परिसरातील जयहिंद चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत करण्यात आलेली केशरी रंगाच्या विद्युत पथदिव्यांची आकर्षक रोषणाई यंदाच्या दीपावलीचे मुख्य आकर्षण ठरली. संपूर्ण रस्ता केशरी प्रकाशाने उजळून निघाल्याने या मार्गाला मुंबईतील प्रसिद्ध मरिन ड्राईव्हसारखा देखणा झगमगता लुक प्राप्त झाला होता. त्यामुळे या परिसराला नागरिकांनी जणू ‘मिनी मरिन ड्राईव्ह’ची उपमा दिली.
रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या उंच इमारतींवर करण्यात आलेली रंगीबेरंगी विद्युत सजावटही नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. रात्रीच्या वेळी या रोषणाईचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. आकर्षक प्रकाशयोजनेचा आनंद घेण्यासाठी नागरिकांची या परिसरात वर्दळ पाहायला मिळाली.
दुसरीकडे, घरोघरी आबालवृद्धांनी फटाक्यांची आतषबाजी करत दीपावलीचा आनंद द्विगुणित केला. आकाशात झेपावणाऱ्या रंगीबेरंगी फटाक्यांनी संपूर्ण परिसर प्रकाशमय झाला होता. दुष्काळाचे संकट असतानाही बडनेरावासीयांनी उत्साह, आनंद आणि सामाजिक एकोप्याच्या वातावरणात दिवाळीचा सण साजरा केला.
बडनेरा पोलीस ठाण्याची रोषणाईही आकर्षणाचे केंद्र!
यंदाच्या दीपावलीत बडनेरा पोलीस स्टेशनच्या इमारतीवर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई शहरात विशेष चर्चेचा विषय ठरली. पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारापासून संपूर्ण इमारत आणि परिसर रंगीबेरंगी विद्युत दिव्यांनी सजविण्यात आला होता. या आकर्षक सजावटीमुळे पोलीस ठाण्याच्या इमारतीचे रूपच पालटले होते. शहरातील नागरिकांमध्येही या रोषणाईची चर्चा रंगली होती.
एकीकडे दुष्काळाचे सावट आणि दुसरीकडे दीपोत्सवाचा झगमगाट, अशा वातावरणात बडनेरावासीयांनी दिवाळीचा आनंद उत्स्फूर्तपणे साजरा केला. जयहिंद चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतचा ‘मिनी मरिन ड्राईव्ह’चा नजारा आणि पोलीस ठाण्याची आकर्षक सजावट यंदाच्या दीपावलीच्या आठवणींमध्ये विशेष ठरली.



