स्वयंसेवकाचे जीवन म्हणजे समर्पण, अपेक्षाविरहित सेवा आणि राष्ट्रासाठी त्याग! – डॉ. मोहन भागवत

नागपूर सहकारी बँकेच्या लोकार्पण सोहळ्यात सरसंघचालकांचे प्रतिपादन; संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासात प्रचारकांचे योगदान अधोरेखित, ‘स्वयंसेवक’ पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त मांडले विचार
नागपूर : स्वतःच्या इच्छा, अपेक्षा आणि स्वार्थ बाजूला ठेवून संपूर्ण आयुष्य समाज आणि राष्ट्रासाठी समर्पित करणारी व्यक्ती म्हणजे स्वयंसेवक. त्याच्या जीवनात स्वतःसाठी काही मिळविण्याची अपेक्षा नसते, तर समाजाचे जितके भले करता येईल तितके करण्याची भावना असते. समर्पण, संयम आणि निस्वार्थ सेवा हेच स्वयंसेवकाच्या जीवनाचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

नागपूर सहकारी बँकेच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख करत प्रचारकांचे जीवन, त्यांचे समर्पण, त्याग आणि समाजातील योगदान यावर सविस्तर भाष्य केले. यावेळी संघाच्या प्रचारकांच्या जीवनावर आधारित ‘स्वयंसेवक’ या पुस्तकाच्या निर्मितीमागील भूमिकेवरही त्यांनी प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागताचा उल्लेख करताना डॉ. भागवत यांनी मिश्कील टिप्पणी केली. ‘माझे स्वागत करणे सांगायची गरज पडत नाही,’ असे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मनात जे आले, तेच आपल्या मनातही आले, असा उल्लेखही त्यांनी केला.
संघाचा शंभर वर्षांचा प्रवास स्वकर्तृत्वाचा!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख करताना डॉ. भागवत म्हणाले की, संघाचा आजचा प्रवास कोणाच्या कृपेने झालेला नाही, तर तो स्वकर्तृत्व आणि सातत्यपूर्ण कार्याच्या बळावर उभा राहिला आहे. माणसाला चांगले बनविले, तर सर्व गोष्टी चांगल्या होऊ शकतात. व्यक्तीच्या जडणघडणीवर समाजाचे आणि राष्ट्राचे भवितव्य अवलंबून असते.
चांगले काम करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्च करणाऱ्या व्यक्तीला प्रचारक म्हटले जाते. संघाचा विस्तार झाला तसतसे प्रचारकांचे कार्यही वाढत गेले. मात्र, प्रचारक स्वतःच्या इच्छा आणि अपेक्षा बाजूला ठेवून आपले संपूर्ण जीवन संघाच्या कार्यासाठी समर्पित करतो. गेल्या शंभर वर्षांपासून ही परंपरा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रचारकाचे जीवन हे अत्यंत साधे आणि अपेक्षाविरहित असते. त्याला स्वतःच्या कार्याची प्रसिद्धी किंवा कौतुक अपेक्षित नसते. आपली क्षमता आणि मर्यादा समजून तो काम करत असतो. मात्र, त्याच्या कार्याकडे समाज आदराने पाहतो. तो ज्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी उत्साह आणि चैतन्य निर्माण करतो. आपल्या आचरणातून इतरांना प्रेरणा देतो, असेही भागवत म्हणाले.
परदेशातील विकसित देशांनाही प्रचारकांच्या जीवनाचे आश्चर्य!
आपल्याला प्रचारक म्हणून अनेक तथाकथित विकसित देशांमध्ये जाण्याची संधी मिळते. तेथे कर्तृत्वसंपन्न लोक आहेत. मात्र, संघामध्ये अशा प्रकारचे समर्पित कार्यकर्ते कसे तयार होतात, याचे त्यांना आश्चर्य वाटते. कारण या कार्यातून वैयक्तिक लाभ मिळत नाही, प्रसिद्धी मिळत नाही किंवा कौतुकाची अपेक्षाही नसते. तरीही शंभर वर्षांपासून वेगवेगळ्या वयोगटातील लोक आपले आयुष्य संघकार्यासाठी देत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
संघाच्या कार्यासाठी अनेक जण आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करतात. त्यांना कधी धन्यवादही मिळत नाहीत. तरीही ते कोणत्याही अपेक्षेशिवाय काम करत राहतात. स्वयंसेवकाच्या जीवनात अहंकार किंवा स्वतःसाठी काही मिळविण्याची भावना नसते. समाजाचे भले व्हावे आणि देशाचे भविष्य उज्ज्वल व्हावे, हीच त्यांची प्रेरणा असते, असे भागवत यांनी स्पष्ट केले.
प्रचारकांच्या जीवनावर पुस्तक; विदर्भातील ७०० ते ८०० प्रचारकांचा उल्लेख
संघाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रचारकांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तक समोर येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. श्याम भाऊ यांनी स्वतः प्रचारक असूनही वेळ काढून एक टीम तयार केली आणि त्या माध्यमातून पुस्तकाची निर्मिती केली, असे त्यांनी सांगितले.
विदर्भातच सुमारे ७०० ते ८०० प्रचारक कार्यरत असल्याचा उल्लेख करत प्रत्येक प्रचारकाच्या जीवनकार्याची नोंद घेणे सोपे नसल्याचे त्यांनी सांगितले. कदाचित आपण त्यांच्या संपर्कात आलो, म्हणून आपल्या जीवनकार्याबद्दल लिहिण्यात आले असावे, अशी विनम्र भावना त्यांनी व्यक्त केली.
पुस्तकाचा उद्देश केवळ प्रचारकांचे मोठेपण सांगणे नसून, प्रेरणादायी व्यक्तींचे जीवन समाजासमोर आणणे हा आहे. प्रचारकही आपल्यासारखीच सामान्य माणसे असतात. त्यांनाही सामान्य माणसांप्रमाणे आवडी-निवडी असतात, मात्र ते आपल्या वैयक्तिक इच्छांपेक्षा समाजकार्याला प्राधान्य देतात, हे या पुस्तकातून स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले.
आपल्यासोबत कार्य करणारे तीन सहकारी आधीच निघून गेले, याची आठवण सांगताना त्यांनी नियतीचा उल्लेख केला. वयाने आणि वरिष्ठतेने आपण आधी जायला हवे होते, मात्र सहकारी आधी गेले, असे भावनिक उद्गारही त्यांनी काढले.
संघावरील बंदीच्या काळातील आठवणींना उजाळा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासातील सुरुवातीच्या काळाचा संदर्भ देताना डॉ. भागवत यांनी संघावर बंदी घालण्याच्या प्रयत्नांचा उल्लेख केला. त्या काळात संघाच्या समर्थनार्थ उभे राहणारे स्वयंसेवक किंवा संघाच्या विचारांचे समर्थक फारसे नव्हते, असे त्यांनी सांगितले.
संघ सांप्रदायिक नाही, त्यामुळे त्यावर बंदी घालू नये, अशी भूमिका मांडणारेही त्या काळात फारसे नव्हते. मात्र, संघावर पहिल्यांदा बंदी घालण्यात आली, तेव्हा त्याला विरोध करणाऱ्या पहिल्या व्यक्तींमध्ये इब्राहिम नावाचे मुस्लिम व्यक्ती होते, अशी आठवण त्यांनी सांगितली.
त्यावेळी हिंदुस्थान हिंदू राष्ट्र आहे, असे सांगणाऱ्यांना वेड्यांच्या रुग्णालयात पाठवले पाहिजे, असे मत व्यक्त करण्यात आले होते. मात्र, डॉ. हेडगेवार यांना आपण ओळखतो, ते वेडे नव्हते, तर चांगले व्यक्ती होते. त्यामुळे संघाला सांप्रदायिक म्हणता येणार नाही, अशा आशयाची भूमिका त्या व्यक्तीने मांडली होती, असे भागवत यांनी नमूद केले.
सहकार क्षेत्रातही सामान्य माणसाच्या हिताला प्राधान्य हवे!
सहकार क्षेत्राच्या भूमिकेवर भाष्य करताना डॉ. भागवत यांनी बाळासाहेबांच्या एका विधानाची आठवण करून दिली. ‘तळ राखेल तो पाणी चाखेल,’ असे ते म्हणाले होते. मात्र, ही प्रवृत्ती सहकार क्षेत्रात योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देशभरात संघाच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या सहकारी संस्थांचा उद्देश सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे हा असला पाहिजे. चांगले काम करणाऱ्यांना वेळेवर पैसा मिळावा आणि त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी सहकार व्यवस्थेची भूमिका असणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
संकटे, मोह आणि अपेक्षांवर मात करणारे स्वयंसेवक!
स्वयंसेवकांचे जीवन सोपे नसते. त्यांना अनेकदा प्रवाहाच्या विरुद्ध जावे लागते. काम करताना विविध संकटे येतात, अनेक प्रकारचे मोह दाखविले जातात. मात्र, त्यावर मात करून समाज आणि देशाच्या भविष्यासाठी काम करणारे कार्यकर्ते संघात आहेत, असे भागवत म्हणाले.
स्वतःला स्वयंसेवक म्हणवणाऱ्या ७० ते ७५ लाख लोकांपैकी सुमारे चार हजार जण स्वतःच्या अपेक्षा बाजूला ठेवून देशाच्या भविष्यासाठी पूर्णवेळ जीवन जगतात, असा उल्लेखही त्यांनी केला.
संयम आणि सहनशीलतेचे महत्त्व सांगताना त्यांनी भगवान विष्णू आणि भृगू ऋषींचे उदाहरण दिले. भृगू ऋषींनी भगवान विष्णूंच्या छातीवर लाथ मारली, तरी भगवान विष्णूंनी राग व्यक्त न करता त्यांच्या पायाची विचारपूस केली. इतक्या कठीण छातीवर लाथ मारल्याने तुमच्या पायाला दुखापत झाली नाही ना, अशी विचारणा त्यांनी केली. या उदाहरणातून संयम आणि सहनशीलतेचे महत्त्व स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले.
जगाची अपेक्षा भारताकडून!
आजच्या काळात अशा प्रकारचे समर्पित जीवन जगण्याची गरज असल्याचे सांगताना डॉ. भागवत म्हणाले की, जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. जगातील विविध क्षेत्रांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी भारताकडून अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे भारतीय समाजाने समर्पण, संयम, निस्वार्थ सेवा आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांवर आधारित जीवन जगण्याची आवश्यकता आहे.
‘विकसित व्हावे, अर्पित होऊनी जावे,’ या भावनेतून स्वयंसेवकाचे जीवन घडत असते. स्वतःच्या मोठेपणापेक्षा समाजाचे हित महत्त्वाचे मानणाऱ्या अशा जीवनपद्धतीची आज देशाला आणि समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. मोहन भागवत यांनी केले.



