amravaticitynewsFarmersCrisis

शेतकऱ्यांना पाच हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टाच!

वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी; चटणी-भाकर खाऊन शासनाचा निषेध, मदतीची रक्कम वाढविण्याची मागणी

अमरावती : दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका करत वंचित बहुजन आघाडीने अमरावतीत आक्रमक आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष नुकसानीच्या तुलनेत जाहीर करण्यात आलेली मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचा आरोप करीत संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी केली.

दिवाळीसारख्या आनंदाच्या सणातही शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर पडू शकलेला नाही. पिकांचे नुकसान, वाढता उत्पादन खर्च आणि कर्जाचा बोजा यामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना शासनाकडून केवळ पाच हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या रकमेतून शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई होणे शक्य नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे शासनाने जाहीर केलेली मदत ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असल्याचा आरोप करण्यात आला.

या आंदोलनादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकऱ्यांसोबत चटणी-भाकर खाऊन आपला निषेध नोंदविला. शेतकऱ्यांच्या वेदना आणि आर्थिक परिस्थिती सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी काळी दिवाळी आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दरम्यान, राज्यातील शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने राज्यभर काळी दिवाळी आंदोलन पुकारले आहे. केवळ मदतीच्या घोषणा न करता शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष नुकसानीचा विचार करून भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

सणासुदीच्या काळातही शेतकऱ्यांच्या घरात आर्थिक संकटाचे सावट असताना शासनाच्या मदतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आता या आंदोलनाची दखल घेऊन शासन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठोस निर्णय घेणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button