‘यंदा दिवाळी साजरी करणार नाही’; शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी रोहित पवारांचा महाराष्ट्र दौरा!

यवतमाळच्या खाणगावात शेतकरी कुटुंबाची भेट घेत साधला संवाद; शेतकरी संतोष गडई यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे दिला ५ हजारांचा धनादेश, विविध राजकीय मुद्द्यांवरही रोहित पवारांची फटकेबाजी.
यवतमाळ : राज्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे. स्वतःच्या घरी दिवाळी साजरी करण्याऐवजी महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांचा दौरा करून शेतकऱ्यांच्या व्यथा आणि अडचणी समजून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यवतमाळ तालुक्यातील खाणगाव येथे पल्लवी अनिल लीलहारे यांच्या घरी भेट देत त्यांनी शेतकरी कुटुंबाशी संवाद साधला.

यावेळी शेतकऱ्यांच्या अडचणी, शेतीतील नुकसान आणि आर्थिक परिस्थिती याबाबत त्यांनी माहिती घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा दौरा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी यंदा दिवाळीचा आनंद बाजूला ठेवून राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांसाठी शेतकऱ्याचा ५ हजारांचा धनादेश!
या दौऱ्यादरम्यान यवतमाळमधील शेतकरी संतोष गडई यांनी आमदार रोहित पवार यांच्याकडे मुख्यमंत्री यांना देण्यासाठी ५ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. मुख्यमंत्र्यांनी दिवाळी साजरी करण्यासाठी ही रक्कम पाठवत असल्याचे सांगत त्यांनी उपरोधिक शब्दांत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांना आवडणारे सहा हजार रुपयांचे चॉकलेटही या रकमेतून घेता येईल, असा टोला त्यांनी लगावला. या प्रसंगामुळे शेतकऱ्यांच्या भावनांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.
प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीबाबतही स्पष्टीकरण
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीच्या चर्चेवर बोलताना रोहित पवार म्हणाले की, शरद पवार रुग्णालयात असल्याने त्यांच्यावर अधिक ताण देणे योग्य नाही. पटेल यांच्याशी संबंधित काही काम असेल, तर ते ११ तारखेनंतर करता येईल. त्यामुळे कदाचित त्यांनी ११ तारखेनंतर भेटण्याबाबत सांगितले असावे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
बीडमधील आत्महत्या प्रकरणावर लढा सुरूच ठेवणार
बीडमधील आत्महत्येच्या प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी क्रीडा प्रमाणपत्रातील कथित गैरप्रकाराचा मुद्दा उपस्थित केला. संबंधित व्यक्तीने या प्रकरणाविरोधात लढा दिला होता. आता हा लढा आम्ही पुढे नेणार असल्याचे सांगत या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली.
गोकुळ प्रकरणावरून सरकारला सवाल
राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने बोलताना रोहित पवार यांनी गोकुळमधील घडामोडींवर प्रश्न उपस्थित केले. सामान्य नागरिक सरकारला विचारत आहेत की, हे नेमके का केले? गोकुळमध्ये असे घडत असेल, तर जिल्हा बँका आणि दूध संघांमध्येही अशा प्रकारच्या घडामोडी घडू शकतात, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
मुश्रीफ प्रकरणाच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह
हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित प्रकरणावर बोलताना रोहित पवार यांनी तपास प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला. संपूर्ण तपास केल्यानंतर क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला की आधीच क्लीन चिट देण्याच्या उद्देशाने तपास करण्यात आला, याची पडताळणी होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
जयकुमार गोरेंच्या विधानाला रोहित पवारांचे प्रत्युत्तर
मंत्री जयकुमार गोरे यांनी रोहित पवार यांच्या राजकीय ओळखीबाबत केलेल्या विधानावरही त्यांनी प्रत्युत्तर दिले. शरद पवार, अजित पवार आणि पवार कुटुंबीयांमुळे आपली ओळख निर्माण झाली, हे त्यांनी मान्य केले. मात्र, केवळ राजकीय ओळखीच्या जोरावर नव्हे, तर जनतेच्या प्रश्नांसाठी आपण काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी जयकुमार गोरे यांच्यावर टीका करत सोलापूरमधील कथित गैरव्यवहारांचा उल्लेख केला आणि गंभीर आरोप केले.
एकूणच, यवतमाळ दौऱ्यात रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबतच राज्यातील विविध राजकीय आणि सहकार क्षेत्रातील मुद्द्यांवर भाष्य केले. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी दिवाळी साजरी न करण्याचा घेतलेला निर्णय, शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांच्या नावे दिलेला धनादेश आणि विविध नेत्यांवरील टीका यामुळे त्यांचा यवतमाळ दौरा चर्चेत आला आहे.
बाईट : रोहित पवार – आमदार.



