BuldhanacitynewsFarmersCrisis

पेंटाकळी प्रकल्पाचे पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडा; संजय रायमुलकर यांचे बेमुदत उपोषण

शेतकऱ्यांच्या खरीप पिकांच्या संरक्षणासाठी पाण्याची मागणी; पाणी सोडेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा माजी आमदारांचा इशारा

मेहकर, बुलढाणा (गजानन राऊत) : पेंटाकळी प्रकल्पातील पाणी मेहकर येथील पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेचे (शिंदे गट) माजी आमदार संजय रायमुलकर यांनी नदीपात्रात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मेहकर परिसरातील दुष्काळी परिस्थिती आणि खरीप पिकांवर निर्माण झालेल्या पाण्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.

पेंटाकळी प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडल्यास परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. खरीप हंगामातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी पाण्याची नितांत गरज असल्याचे रायमुलकर यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपण महायुतीचा घटक असलो, तरी आवाज उठविण्यापासून मागे हटणार नसल्याची भूमिकाही त्यांनी मांडली.

पेंटाकळी प्रकल्पाचे पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात यावे, ही मागणी मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा संजय रायमुलकर यांनी दिला आहे. त्यांच्या या आंदोलनामुळे पाणीप्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासन आता काय भूमिका घेते, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button