नागपुरात तीन सराईत गुन्हेगारांना एक वर्षासाठी हद्दपार!

पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; पाचपावली पोलिसांकडून हद्दपारीच्या आदेशांची अंमलबजावणी
नागपूर : शहरातील गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५६(१)(ब) अंतर्गत हद्दपारीचे आदेश काढण्यात आले असून, तिघांनाही एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

पोलीस उपायुक्त राहुल मदने (परिमंडळ क्रमांक ३) आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे व सहायक पोलीस निरीक्षक सचिन भोंडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत शेख जाबीर ख्वाजा अली (वय २६, रा. फारुखनगर, मक्का मस्जिदजवळ, पाचपावली, नागपूर) याच्याविरुद्ध २९ सप्टेंबर २०२६ रोजी हद्दपारीचा आदेश काढण्यात आला होता. त्याची २४ ऑक्टोबर रोजी आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली.
तसेच विरेंद्रसिंग उर्फ बाबूबकरी बलसिंग रामगडिया (वय ३०, रा. लष्करीबाग, तक्षशिला बौद्ध विहारामागे, पाचपावली, नागपूर) याच्याविरुद्ध २१ ऑक्टोबर २०२६ रोजी आदेश जारी करण्यात आला होता. त्याची २९ ऑक्टोबर रोजी अंमलबजावणी करण्यात आली.

तिसरा आरोपी तुषार उर्फ पितू किरण पराते (वय २०, रा. महादेव मंदिरासमोर, टक्करग्राम, पाचपावली, नागपूर) याच्याविरुद्ध २९ सप्टेंबर २०२६ रोजी हद्दपारीचा आदेश काढण्यात आला होता. त्याची ३१ ऑक्टोबर रोजी अंमलबजावणी करण्यात आली.
तिन्ही जणांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आल्याची नोंद पोलिसांच्या कारवाई अहवालात आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवायांवर भर दिला जात आहे.



