दुष्काळ निवारणासाठी ग्रामपंचायत स्तरावर आराखडे तयार करा; पालकमंत्री बावनकुळेंचे निर्देश

दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाच तास बैठक; निधी प्रत्यक्ष उपाययोजनांवर खर्च करण्याचे आदेश
अमरावती : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर स्वतंत्र दुष्काळ आराखडे तयार करा आणि त्यानुसार आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तब्बल पाच तास बैठक पार पडली.
या बैठकीत जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती, गावनिहाय गरजा आणि संभाव्य उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावातील परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक कामांचा आराखडा तयार करावा. त्यानुसार पाणीटंचाईसह दुष्काळ निवारणासाठी आवश्यक उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
दुष्काळ निवारणासाठी शासनाकडून उपलब्ध होणारा निधी केवळ कागदोपत्री कामांवर खर्च न करता प्रत्यक्ष मदत आणि उपाययोजनांसाठी वापरण्यात यावा, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. गावनिहाय परिस्थिती लक्षात घेऊन पाणी उपलब्धता, आवश्यक कामे आणि त्यांची अंमलबजावणी यांचे नियोजन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
दरम्यान, ग्रामपंचायत स्तरावर तयार होणाऱ्या दुष्काळ आराखड्यांची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते आणि निधीचा वापर प्रत्यक्षात किती परिणामकारक ठरतो, याकडे आता जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



