AchalpurAmravaticitynews

अचलपूर ते वर्धा दरम्यान आकाशात घिरट्या घालणारे विमान; नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीती

विमान कमी उंचीवरून वेगाने जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे; नेमके कारण अद्याप अस्पष्ट, संबंधित यंत्रणेकडून खुलाशाची मागणी

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अचलपूरसह परिसरात आज सायंकाळी आकाशात कमी उंचीवरून वेगाने जाणारे एक विमान नागरिकांच्या नजरेस पडले. अचानक दिसलेल्या या विमानामुळे नागरिकांमध्ये कुतूहलासोबतच भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. अनेक नागरिकांनी या विमानाचे दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपले असून, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरही प्रसारित होत आहेत.

नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास अचलपूर परिसरात हे विमान आकाशात खूपच कमी उंचीवरून जाताना दिसले. विमानाचा वेग आणि त्याची हालचाल पाहून काही नागरिकांनी ते दिशा भरकटले असावे, अशी शंका व्यक्त केली. सोशल मीडियावरील काही पोस्टमध्ये अमरावतीपासून वर्धा जिल्ह्यापर्यंत विविध ठिकाणी हे विमान दिसल्याचे दावे करण्यात येत आहेत. काही नागरिकांनी दुपारी दोन वाजल्यापासून विमान दिसत असल्याचेही म्हटले आहे.

मात्र, हे विमान नेमके कोणत्या प्रकारचे होते, ते कोणत्या उद्देशाने उड्डाण करीत होते आणि त्याचा मार्ग कोणता होता, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सोशल मीडियावरील दाव्यांचीही स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

या घटनेमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी विमानतळ प्रशासन, हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणा किंवा संबंधित विभागाने तातडीने अधिकृत माहिती द्यावी, अशी मागणी होत आहे. विमानाच्या उड्डाणामागील नेमके कारण स्पष्ट झाल्यानंतरच या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button