
छत्रपती मैदान परिसरात वळूच्या हल्ल्याच्या भीतीने नागरिकांमध्ये दहशत; पशुविभागाच्या पथकाने वळूला पकडून गोरक्षणात केले बंदिस्त
अमरावती : शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील रवी नगर परिसरातील छत्रपती मैदानाजवळ एका पिसाळलेल्या वळूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा वळू नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याने तसेच त्यांचा पाठलाग करून हल्ला करण्याचा प्रयत्न करीत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. या प्रकाराची तक्रार प्राप्त होताच नगरसेविका प्रियंका भूषण पाटणे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पशुविभागाच्या मदतीने वळूला पकडण्याची व्यवस्था केली.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरसेविका प्रियंका पाटणे यांनी महापालिकेच्या पशुविभागाशी तात्काळ संपर्क साधला. त्यानंतर पशुविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेत वळूला ताब्यात घेतले आणि पुढील सुरक्षिततेसाठी गोरक्षण येथे बंदिस्त केले. त्यामुळे संभाव्य दुर्घटनेचा धोका टळल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
या कारवाईदरम्यान सामाजिक कार्यकर्ते भूषण अरविंदराव पाटणे यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्यात सहकार्य केले. पशुविभागाचे निरीक्षक पंकज कल्याणकर, प्रफुल्ल लोखंडे, तोकीर भाई, प्रधान, विजय तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी वळूला पकडण्याच्या मोहिमेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
रवी नगर आणि छत्रपती मैदान परिसरात पिसाळलेल्या वळूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल घेत तातडीने कार्यवाही करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. नगरसेविका प्रियंका पाटणे आणि पशुविभागाच्या पथकाने वेळेत हस्तक्षेप केल्याबद्दल परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा प्रकारच्या घटनांवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असून, परिसरात मोकाट जनावरांचा त्रास होऊ नये, अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



