AmravaticitynewsCrime News

वलगाव घरफोडीचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तीन आरोपी जेरबंद!

५० हजार रुपयांचा चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत; गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

सिटी न्यूज | अमरावती

अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला अंदाजे ५० हजार रुपये किमतीचा संपूर्ण मुद्देमाल शंभर टक्के हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हे शाखेचे पथक अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना वलगाव परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. वलगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अप. क्र. ४८९/२०२६, कलम ३३१(४), ३०५(अ) भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत नोंदविलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी संशयितांचा शोध घेत सापळा रचला.

या कारवाईत अक्षय ऊर्फ अभी प्रभाकर पतंगराव (वय २४, रा. कामुंजा, वलगाव), तेजस ऊर्फ चेतन राजू भांबुरकर (वय २४, रा. समतानगर, वलगाव) आणि शैलेश ऊर्फ भुऱ्या गजानन देवरे (वय २०, रा. समतानगर, वलगाव) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान तिन्ही आरोपींनी संबंधित गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्याकडून चोरीस गेलेला अंदाजे ५० हजार रुपये किमतीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी तिन्ही आरोपी आणि जप्त करण्यात आलेला संपूर्ण मुद्देमाल वलगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक १ यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक २ श्याम घुगे आणि पोलीस उपायुक्त मुख्यालय प्रांजली सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) नीलेश ब्राह्मणे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे, युनिट २ चे पोलीस निरीक्षक अतुल वर तसेच सहायक पोलीस निरीक्षक महेश इंगोले, पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनुने आणि गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.

गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे वलगाव परिसरातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून, चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button